मधुबनी(बिहार)- राष्ट्रपती रामनाथ कोविंद 9 वी मध्ये शिकणाऱ्या रेयाझ या विद्यार्थ्याला रेसिंग सायकल भेट दिली. रेयाझ मूळचा बिहारचा असून दिल्लीत शिक्षण घेतो. 2017 मध्ये त्याने दिल्ली स्टेट सायकलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते.
बकरी ईदच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मधुबनी जिल्ह्यातील रेयाझ याला रेसिंग सायकल भेट दिली. रेयाझ याला राष्ट्रपतींनी सायकल भेट दिल्यामुळे जिल्ह्याचा नावलौकिक वाढल्याच्या भावना जिल्ह्यातील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. रेयाझ दिल्लीतील आनंद विहार येथील सर्वोदय बाल विद्यालयात नववीमध्ये शिकत असून त्याला आंतरराष्ट्रीय खेळाडू बनायचे आहे.
रेयाझ याला रेसिंग सायकलिंगची आवड आहे.अभ्यास झाल्यानंतर तो सायकलिंगसाठी वेळ देतो. रेयाझचे वडील जेवण बनवण्याचे काम करतात. रेयाझ देखील एका ढाब्यावर काम करतो आणि त्याच्या दोन बहिणी व एक भाऊ बिहारमधील गावी राहतात. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सायकल भेट दिल्याचे फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाँऊटवर प्रसिद्ध केले आणि रेयाझला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
रेयाझ युवकांसाठी प्रेरणास्थान
रेयाझ हा भारतातील युवकांसाठी प्रेरणास्थान आहे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे. सायकलिंग स्पर्धेतील यश त्याने कष्ट, मेहनत यांच्या जोरावर मिळवले आहे. रेयाझ कष्टाळू आहे,अशा शब्दात राष्ट्रपतींनी रेयाझचे अभिनंदन केले आहे.