नवी मुंबई- कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरेपीचा वापर होत असून रुग्णांना त्याचा फायदा होत आहे. या थेरेपीचा वापर व्यापक प्रमाणात होण्यासाठी कोरोनावर मात करून बरे झालेल्या रुग्णांनी अन्य रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा दान करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबईत पहिल्यांदाच प्लाझ्मा दान शिबिराचे आयोजन खासदार राजन विचारे यांच्या मार्फत करण्यात आले. यावेळी बऱ्याच प्लाझ्मा दात्यांनी या शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
एखादा विषाणू शरीरात शिरला की मानवी शरीर त्याला हुसकावून लावण्यासाठी जोरदार प्रयत्न करते. विषाणू आणि शरीरात होणाऱ्या या लढाईत अँटिबॉडीज शरीराराचे सैनिक असतात. एका विशिष्ट विषाणूला मारण्यासाठी आपले शरीर विशिष्ट प्रकारच्या अँटिबॉडीज तयार करते. या अँटिबॉडीज आपल्या रक्तातल्या प्लाझ्मामध्ये असतात. कोव्हिडमधून बऱ्या झालेल्या व्यक्तीच्या शरीरात कोरोनाशी लढू शकणाऱ्या अँटिबॉडीज मुबलक असतात. त्या काढून कोरोनाशी लढणाऱ्या एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या शरीरात सोडल्या तर मग त्या वृद्ध व्यक्तीचे शरीर कोरोनाशी चांगल्या पद्धतीने दोन हात करू शकते.
नवी मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज होणारी वाढ पाहता यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोरोनावर मात केलेल्या नागरिकांनी प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन सरकार कडून करण्यात येत आहे. आता नवी मुंबईत शिवसेनेच्या वतीने पहिल्या प्लाझ्मा दान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कोरोनावर मात केलेल्या अनेक व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे नवी मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी या शिबिराचा फायदा होईल, अशी प्रतिक्रिया खासदार राजन विचारे यांनी व्यक्त केली.