सांगली- जिल्हा पालक मंत्री यांच्या आदेशाने वाळवा तहसील (पुरवठा) विभागाने तीन-चार महिन्यापूर्वी शिधापत्रीकेचा मेळावा आयोजित केला होता. त्याद्वारे तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना जिर्ण, खराब झालेल्या शिधापत्रिका, विभक्त शिधापत्रिका, माहिती दुरुस्ती व नवीन शिधापत्रिका तयार करण्याचे आवाहन करण्यात आले होते. याला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने नागरिकांनी कागदपत्रांसह आपापल्या शिधापत्रिका पुरवठा विभागाकडे जमा केल्या होत्या. विभागाकडून त्यावर कोणतीही कृती करण्यात आलेली नाही, परिणामी शिधापत्रिका धारकांना गैरसोय होत आहे.
शिधापत्रिका नसल्याने तसेच, ज्यांच्याकडे आहे त्यांच्या शिधापत्रिकेत दुरुस्ती नसल्याने त्यांना सरकारकडून मिळणार लाभ घेण्यास अडचण येत आहे. तसेच धान्य घेताना देखील फसवणुकीला समोर जावे लागत आहे. सध्या पुरवठा विभागाकडे 6 हजाराहून अधिक शिधापत्रिका जमा आहे. याचा पुरवठा विभाग आणि रेशन दुकानदार संगनमताने फायदा घेत असल्याच्या तक्रारी आहेत. सध्या ज्यांचे रेशन कार्ड पुरवठा विभागाकडे जमा आहेत, त्यांना धान्य देण्यास रेशन दुकानदार टाळत आहेत. तसेच, शिधापत्रिकेवरील आर.सी नबंर मशीनमध्ये स्कॅन होत नाही, व या सारख्या इतर तांत्रिक अडचणी असल्याचे सांगून रेशन दुकानदार शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळण्यास रोखत असल्याचे पुढे आले आहे. याबाबत नागरिकांनी पुरवठा विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र पुरवठा विभाग त्याकडे दुर्लक्ष करत आहे. तसेच, वरिष्ठ देखील या तक्रारींकडे लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
पुरवठा विभागाकडून गहू व तांदळाला 50 किलो वजनाचा दर लावला जातो. मात्र पोते 42/45 किलोच भरत असल्याने रेशन विक्रेत्याला 50 किलोच्या पोत्यामागे 6 ते 8 किलोचा भुर्दंड सोसावा लागत आहे. तसेच, चलन भरण्यासाठी पुरवठा विभागात विनाकारण अतिरिक्त 200 तर कधी 400 रुपये भरावे लागत आहे.
सध्या केद्र शासन व महाराष्ट्र शासनातर्फे जुलै महिन्यात लाभार्थ्यांना मोफत धान्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. परंतु आज तारखेला अनेक रेशन दुकानदार आमच्याकडे माल आलाच नाही, अशी बतावणी करत आहेत. या सर्व कारभाराची चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश देऊन वाळवा तालुक्यातील जनतेला न्याय द्यावा. धान्याचा काळ्याबाजार करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी जनतेतून मागणी होत असल्याचे शिवसेना शहर प्रमुख नगरसेवक शकील सय्यद यांनी सांगितले. तसेच, चौकशी न केल्यास शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर अंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शकील सय्यद यांनी दिला आहे.