बंगळुरू - यंदाच्या आयपीएलमध्ये आरसीबी संघाने निराशाजनक कामगिरी केली आहे. सलग ६ सामने त्यांनी गमावले आहेत. पार्थिव पटेल सोडले तर इतर कोणत्याही फलंदाजाने या सामन्यात आपली छाप सोडलेली नाही. काही सामन्यांत तो एकाकी लढताना दिसून येत आहे. तरीही संघाचे नशीब बदलत नाही. सध्या पार्थिव पटेल अडचणीत आहे. आयपीएलचा सामना संपला की तो तत्काळ रुग्णालयाकडे धाव घेत आहे.
पार्थिव पटेल सध्या दुहेरी जबाबदारी पार पाडतोय. त्याचे कारणही तसेच आहे. त्याचे वडील आजारी आहेत. ते हैदराबाद येथील रुग्णालयात अॅडमीट आहेत. त्यांची काळजी घेण्यासाठी सामना संपला, की तो रुग्णालयाकडे धाव घेतो. त्याचे वडील ब्रेन हॅमरेजमुळे त्रस्त असल्याने फेब्रुवारीपासून ते रुग्णालयात दाखल आहेत.
याचबरोबर पार्थिव सतत फोनवर असतो. फोनच्या माध्यामातूनही तो वडिलांची विचारपूस करीत असतो. सामना सुरू असताना त्याचे घरचे त्याला फोन करत नाही. सामना संपल्यावर तो घरच्यांशी संपर्क साधतो.
सामना संपल्यावर आरसीबीने त्याला घरी जाण्याची परवानगी दिली आहे. सततच्या प्रवासामुळे त्याच्या कामगिरीवर कोणताच परिणाम दिसून येत नाही. वडील आजारी असल्याने त्याने सैयद मुश्ताक अली स्पर्धेतही भाग घेतला नव्हता. घरातील लोकांच्या सांगण्यावरून तो पुन्हा या स्पर्धेत उतरला. काही दिवसांपूर्वी पार्थिव पटेलने सोशल मीडियावर चाहत्यांना त्याच्या वडिलांसाठी प्रार्थाना करण्याचेही आव्हान केले होते.