श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या कमलकोटे सेक्टरमध्ये शनिवारी पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानकडून भारतीय सैन्य आणि नागरिकांवर अचानकपणे गोळीबार झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
“सकाळी 9:20 च्या सुमारास उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरी भागात कमलकोटे सेक्टर येथे पाक सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.” असे या अधिकाऱ्याने सांगितले. पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्याला चिथावणी देताना त्यांच्या चौक्यांवर गोळीबार केला. अजूनही हा गोळीबार सुरूच असल्याचे ते म्हणाले. तसेच, भारतीय लष्कर पाकिस्तानी सैनिकांना चोख प्रत्युत्तर देत आहे, असेही त्यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसातले पाकिस्तानी सैनिकांकडून झालेले हे जिल्ह्यातील शस्त्रसंधीचे दुसरे उल्लंघन आहे. शुक्रवारी, जिल्ह्यातील रामपूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्याने अंदाधुंद गोळीबार केल्यामुळे एका 48 वर्षीय महिलेला जीव गमवावा लागला.
बाटगरान येथील एका घराला पाकिस्तानी तोफगोळ्यांनी लक्ष्य केल्यामुळे जम्मूर अहमद चेचीची पत्नी अख्तर बेगम ही जागीच ठार झाली. या घटनेत एक 23 वर्षीय महिलाही जखमी झाली आहे. पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात चार घरे आणि मशिदीचे नुकसान झाले. अनेक कुटुंबांनी भूमिगत सुरक्षा बंकरमध्ये आश्रय घेतला किंवा उरी तहसीलमधील इतरत्र सुरक्षित ठिकाणी त्यांना हलविले आहे.