नाशिक - कळवण तालुक्यातील दोन कृषी दुकाने फोडून कांदा बियाणे चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच कळवण - देवळा मार्गावरील कृषी केंद्र चोरट्यांनी फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानातुन दीड लाख रुपयांचे कांदा बियाणे व रोख रक्कम लंपास केली आहे.
कळवण तालुक्यात मागील महिन्यात दोन कृषी दुकाने फोडून कांदा बियाणे चोरीला गेल्याची घटना घडली होती. आता पुन्हा बुधवारी रात्री कळवण - देवळा रस्त्यावरील गणेशनगर भागातील अतुल रौंदळ यांच्या किसान ट्रेडर्स या कृषी दुकानात चोरी झाली आहे. दुकानाच्या मागच्या बाजूचा पत्रा कापुन चोरट्यांनी आत प्रवेश करत नामांकित कंपनीचे सुमारे दीड लाख रुपये किमतीचे कांदा बियाणे व पाच हजार रुपये रोख रक्कम लंपास केली आहे.
दरम्यान, अशाचप्रकारे मागील महिन्यात कळवण येथील दत्त मंदिरासमोर असलेल्या गुरुदत्त कृषी सेवा केंद्र आणि शिरसमनी येथील यशवंत कृषी सेवा केंद्राचा पत्रा कटरच्या सहाय्याने कापून दुकानात प्रवेश करत लाखो रुपयांचे कांदा बियाणे चोरी करण्यात आले होते. या प्रकरणी तपास सुरु असतानाच आता ही तिसरी घटना घडली.
मुख्य म्हणजे, कांदा बियाण्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले असताना आता चोरट्यांनी कांदा बियाणे चोरी कडे आपला मोर्चा वळवला असून कृषी सेवा केंद्रांना लक्ष्य केले जात असल्याने पोलिसांनी या चोरट्यांचा शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी कृषी सेवा केंद्र चालकांनी केली आहे.