पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात खंडणी, दरोडा विरोधी पथकाने एका व्यक्तीला पिस्तुल आणि जिवंत काडतुसासह अटक केली आहे. शहरात कोरोनामुळे संचारबंदी असल्याने गस्त घालत असलेल्या पोलीसांना याची माहिती मिळाली. याप्रकरणी एका 22 वर्षीय तरूणाला अटक केली असून अमोल बसवराज वाले असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर चिखली पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात संचारबंदी असल्याने खंडणी, दरोडा विरोधी पथक शहरात गस्त घालत होते. या दरम्यान पोलीस नाईक किरण काटकर यांना त्यांच्या खबरीमार्फत माहिती मिळाली की, कृष्णा नगर चिखली येथे एक व्यक्ती संशयितरित्या थांबलेला असून त्याच्याकडे पिस्तुला सारखे हत्यार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पात यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित आरोपी अमोल याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे एक पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस मिळाले आहे. ज्याची किंमत 40 हजार 200 रूपये आहे. आरोपी अमोल विरोधात चिखली पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.