वर्धा - सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. यात वर्धा जिल्ह्यात काही दिवसात कोरोनाची सौम्य लक्षणे असणारे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजनेंतर्गत कोरोना रुग्णांवर उपचार केले जाते. पण सौम्य लक्षणे असणारे रुग्ण अपात्र ठरत आहे. ज्या रुग्णांना योजनेचा लाभ मिळणार नाही, त्या रुग्णांसाठी आकारले जाणारे दर वर्ध्याचे जिल्हाधिकारी विवेक भिमानवर यांनी निश्चित करून आदेश पारित केला आहे. यामध्ये प्रति व्यक्ती प्रति दिवसासाठी 700 रुपये दराने शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना सेवग्रामच्या कस्तुरबा गांधी रुग्णालयात तसेच सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय येथे भरती करण्यात येते. या दोन्ही रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राबवली जाते. पण या योजनेमध्ये सौम्य स्वरुपाची लक्षणे असलेला रुग्ण अपात्र ठरत असल्याने त्याला लाभ मिळत नाही. त्यामुळे आशा रुग्णाकडून फी आकारली जाते. या रुग्णांना लुबाडले जाऊ नये यासाठी प्रति रुग्णाला प्रति दिवसासाठी जास्तीत जास्त 700 रुपये या दराने शुल्क आकारण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यामध्ये एका दिवसासाठी लागणारा बेड चार्ज, रुग्णाचे जेवण आणि लागणारे औषधे व इतर उपचार सुविधा सगळे समाविष्ट असणार आहे. यामुळे साधरण 10 दिवसांसाठी 7 हजाराच्या घरात खर्च अपेक्षित आहे.
तपासणीकरिता लागणारी किट ही प्रशासनामार्फत मोफत पुरवल्या जाणार आहे. या किटचा उपयोग आयसीएमआरच्या निकषानुसार करावा लागणार आहे. चाचणीसाठी रुग्णांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येऊ नये, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.
तसेच अल्प उत्पन्न गटात मोडणाऱ्या रुग्णांसाठी आणि धर्मदाय आयुक्त यांच्या आदेशानुसार 10 टक्के बेड हे अत्यल्प उत्पन्न गटातील रुग्णांकरिता राखीव ठेवावे. त्यांना गरजेनुसार निशुल्क उपलब्ध करून द्यावे. रुग्णांना सुट्टी देण्याबाबतचा निर्णय त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर घेतील, असे सांगण्यात आले आहे. मात्र लक्षणे नसल्यास 10 दिवसाच्या अगोदर सुट्टी दिली, तरी त्यांना घरी सोडून न देता त्यांना कोरोना केअर सेंटरमध्ये ठेवण्यात यावे. विशेष म्हणजे यासाठी तिथे कोणतेही शुल्क लागणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.