मुंबई - महापालिकेच्या रुग्णालयांमधून 6 मृतदेह गायब झाल्याचे आरोप पालिकेवर करण्यात येत आहेत. मात्र, या आरोपात तथ्य नसल्याचे पालिकेने म्हटले आहे. घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयातूनच फक्त एक मृतदेह बेपत्ता असून त्या प्रकरणी विशेष चौकशी केली जात आहे. त्याचा अहवाल येत्या पाच दिवसात देण्याचे आदेशही देण्यात आले आहे. याप्ररकणी दोषींवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पालिकेच्या केईएम, नायर, सायन, जोगेश्वरी ट्रॉमा केअर, कांदिवली शताब्दी रुग्णालयातून मृतदेह गायब झाल्याच्या बातम्या समोर आल्या होते. मात्र, नातेवाईक वेळेवर पोहचले नसल्याने तसेच नातेवाईकांशी संपर्क झाला नसल्याने मृतदेहांची ओळख पटवण्यात उशीर झाला होता. मात्र, त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पालिकेने म्हटले आहे. राजावाडी रुग्णालयातील मृतदेह बेपत्ता झाल्याप्रकरणी महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक प्रदीप जाधव यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप आंग्रे यांची एक सदस्यीय चौकशी समिती नेमली असून पुढील ५ दिवसात त्यांना याबाबतचा अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच असे प्रकार पुन्हा होऊ नयेत म्हणून दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 3 जूनच्या रात्री अकरा वाजण्य्च्या सुमारास राजावाडी रुग्णालयाच्या कॅज्युल्टी विभागात एक 23 वर्षीय पुरुष रुग्णाला गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी आणण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात आल्यानंतर थोड्याच वेळाने या रुग्णाचा मृत्यु झाला. या रूग्णाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन होणे गरजेचे असल्याने आणि त्यापूर्वी कोविड-१९ चाचणी करणे देखील गरजेचे असल्याने या मृतदेहाचे कोरोनाचे नमूने घेतल्यानंतर मृतदेह शवागारात ठेवण्यात आला. मात्र, या रुग्णाचा मृतदेह बेपत्ता असल्याचे ७ जून रोजी आढळून आले. यानंतर याप्रकरणी डॉ. आंग्रे यांची चौकशी समिती नेमण्यात आली असून चौकशीची कार्यवाही यापूर्वीच चालू झाली असल्याचे पालिकेने कळविले आहे.