नागपूर - नागपूरमधील कोविड रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागपूरकरांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी झटत आहेत. यासाठी त्यांनी नागपूर महानगरपालिकेच्या कोरोना वॉररूममध्ये महापौर, महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, ड्रग्स डिलर असोसिएशन तसेच सामाजिक आणि वैद्यकीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
कोविड रुग्णांना तातडीने वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी अतिरिक्त बेड्ससाठी आवेदन करणाऱ्या रुग्णालयांना २४ तासांत परवानगी देण्याचे निर्देश यावेळी गडकरींनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात ऑक्सिजन आणि ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या टँकर्सची संख्या वाढवण्यासाठी गडकरी यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत अनेक खासगी कंपन्यांशी बोलणे करून अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा मागवण्यात आला असल्याची माहिती यावेळी नितीन गडकरी यांनी दिली.
'ऑक्सिजन कमी पडू देणार नाही'
नागपूरला ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू देणार नाही, अशी हमी गडकरी यांनी यावेळी दिली. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे सांगण्यात आले आहे. इंजेक्शन आणि औषधांची कमतरता भासू नये यासाठी 'पेटंट अॅक्ट'मधील सेक्शन ८४ शिथिल करण्यासाठी पंतप्रधानांना गडकरी यांनी पत्र पाठवले आले. इंजेक्शन आणि औषधांचे वितरण योग्य पद्धतीने करण्यासाठीच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.