सिंधुदुर्ग- कट्टर राणे समर्थक तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. कुडाळकर यांच्या जाण्यामुळे सेनेने नारायण राणे यांच्या जिल्ह्यात त्यांना मोठा धक्का दिल्याचे बोलले जात आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, गटनेते नागेंद्र परब, माजी तालुकाप्रमुख संतोष शिरसाट, कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक,रुची राऊत ,गितेश राऊत, अशा मोजक्या पदाधिकार्यांच्या उपस्थितीत ओरोस येथील खासदार कार्यालयात सोमवारी हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. खा. विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री उदय सामंत, आ. वैभव नाईक यांच्या सोबत जिल्हाप्रमुख संजय पडते, गटनेते नागेंद्र परब यांच्या साथीने कुडाळ तालुक्यासह अन्य ठिकाणी यापुढे शिवसेना संघटना वाढविण्यासाठी प्रामाणिक काम करणार असल्याचे यावेळी कुडाळकर यांनी सांगितले.
विकास कुडाळकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कट्टर राणेसमर्थक म्हणून ओळखले जातात. राणे यांच्यासोबत शिवसेना पक्षापासून कार्यरत असलेले कुडाळकर राणेंच्या राजकीय प्रवासात त्यांच्यासोबत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी यशस्वी कारभार केलेल्या कुडाळकर यांचा कार्यकर्ता वर्गही मोठा आहे. त्यांच्या सेना प्रवेशाने भाजपला विशेषतः नारायण राणे यांना मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.