नाशिक - नाशिक विभागात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला असला, तरी शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. अद्याप पेरणी योग्य पाऊस झाला असून नाशिक विभागात 2 टक्के पेरण्या झाल्या आहेत, तर जिल्ह्यात 0.23 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सध्या कपाशी, मूग, मका, आदी पिकांची शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे.
सर्वत्र कोरोनाचे सावट असले, तरी हवामान विभागाने यंदाच्या वर्षी चागंल्या पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यंदा मान्सून वेळेवर दाखल झाला असून मागील तीन-चार दिवसांपासून विभागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मशागतीच्या कामाला वेग आला आहे. मात्र, जमिनीत अद्याप पेरणी योग्य ओलावा नसल्याने पेरणीचा वेग कमी आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवात केली आहे.
नाशिक जिल्ह्यात मुगाचे 58 हजार 773 हेक्टर असे सर्वसाधारण क्षेत्र असून 102 हेक्टरवर मुगाची पेरणी झाली आहे. विभागातील नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी कपाशीला पसंती दिली असून 51 हजार 718 हेक्टरवर कपाशीची लागवड पूर्ण झाली आहे. अहमदनगर भागात शेतकऱ्यांनी मुगाला पसंती दिली आहे. जिल्ह्यात 162 हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांनी 532 हेक्टरवर मका लागवड केली आहे. नाशिक व्यतिरिक्त इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मात्र, अद्याप मका पेरणी केली नाही. पावसाच्या आगमनानतंर शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी सुरू केली आहे. एकूणच आता शेतकरी दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.