औरंगाबाद - जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गामुळे झालेल्या मृत्यूची अत्यंत वेदनादायी घटना समोर आली आहे. कोरोनामुळे महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाल्याने अवघ्या सात दिवसांतच एका चिमुकलीने आपली आई गमावली आहे. 28 मे रोजी या महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला होता.
कटकट गेट भागात राहणाऱ्या 30 वर्षीय महिलेला 28 तारखेला घाटी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. महिलेने गोंडस मुलीला जन्म दिल्यावर 29 मे रोजी महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. काही दिवसांच्या उपचारांनंतर या गोंडस मुलीची आणि आईची कायमची ताटातूट झाली. चार जून रोजी कोविड-19 वर उपचार सुरू असताना आईचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि सात दिवसांच्या या चिमुकलीच्या डोक्यावरील मायेचे छत्र कायमचे हरपले आहे.
बाळाचा जन्म झाल्यावर आईचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. मात्र, त्या चिमुकलीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यामुळे बाळाला नवजात शिशू विशेष वॉर्डात ठेवण्यात आले होते. काही दिवसांत महिला चांगली होईल आणि आपल्या बाळाला पुन्हा भेटेल, अशी आशा असताना गेल्या तीन दिवसांपासून महिलेची प्रकृती खालावली. महिलेला श्वास घेण्यास त्रास होत होता. डॉक्टरांनी तिला कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवले होते. मात्र, चार जून रोजी दुपारी या मातेचा कोरोनाविरोधातील लढा अपयशी ठरला आणि त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
चिमुकलीच्या आईच्या निधनाने घाटी रुग्णालयातील सर्वच आरोग्य कर्मचारी हळहळले. बाळाचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला असून बाळाची पुन्हा तपासणी करण्यात आली आहे. लवकरच अहवाल प्राप्त होईल अशी माहिती घाटी आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. आता पर्यंत घाटी रुग्णालयात 22 कोरोना पॉझिटीव्ह महिलांची यशस्वीरीत्या प्रसूती करण्यात आली आहे. त्यात महिलेचा मृत्यू होण्याची औरंगाबाद मधील ही पहिला घटना ठरली.