रत्नागिरी- दापोली तालुक्यात एसटी बस आणि दुचाकी अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी अडीचच्या सुमारास तालुक्यातील दापोली-दाभोळ मार्गावरील वळणे येथे घडली. मिनाक्षी बोर्जे (वय 45) व आकाश बोर्जे ( वय 22) अशी अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चालक एस. डब्लू. सोळंकी हे आपल्या ताब्यातील बस क्र. (एमएच.20.बीएल.2122) घेऊन दाभोळ येथून दुपारी 1.45 वाजता दापोलीकडे येणासाठी निघाले. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांची बस वळणे एमआयडीसीमधील काजू फॅक्टरी जवळ आली असता समोरून येणारी दुचाकी क्र. (एमएच.08.एआर.9782) व बसची समोरासमोर धडक झाली. यात दुचाकी चालक आकाश मंगेश बोर्जे व त्याची आई मिनाक्षी बोर्जे (रा . वळणे) यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, याचवेळी दुसऱ्या दुचाकीवरून नीलेश विलास गोरिवले व त्याचे वडील विलास सोनू गोरिवले हे दापोलीहून देवकेकडे जात होते, मात्र समोरून एसटी येत असल्याचे पाहून त्यांनी दुचाकी डाव्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला असता दुचाकी साईडपट्टीवरून घसरली व दोघेही दुचाकीवरून खाली पडले. यात दोघेही जखमी झाले. या दोघांनाही दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या अपघाताची माहिती निलेश गोरिवले यांनी दापोली पोलिसांना दिली. दापोली पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहे.