अहमदनगर - मोदी सरकारने पाच वर्षांत केवळ बनवाबनवी केली. शेतकऱ्याच्या पदरी या काळात फक्त निराशाच आली, असा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारवर केला. ते अकोले तालुक्यातील राजूर येथे प्रचारसभेत बोलत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत मधुकर पिचडदेखील उपस्थित होते.
थोरात म्हणाले की, मोदींचा अंबानींवर जास्त जीव आहे. राफेल करारात त्यांनी अंबानींचा फायदा करुन दिलाच. पण, पिक विमा योजनेत सुद्धा फायदा करुन दिला. देशभरातून ४० हजार कोटी रुपये पिक विम्याच्या माध्यमातून त्यांनी अंबानींना दिले. जीएसटीसारखी योजना आणून सामान्य माणसाचे आयुष्य कठीण करुन टाकले, असे थोरात म्हणाले.
राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नाला प्रचाराचा मुद्दा करण्यावरही थोरात यांनी मोदींवर टीका केली. ते म्हणाले की, लालबहादूर शास्त्रींनी लाहोरपर्यंत रणगाडे घुसवले. इंदिरा गांधींच्या काळात पाकिस्तान आणि बांगलादेश असे दोन तुकडे केले. पण, कुणीही याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला नाही. मोदी मात्र राष्ट्रीय सुरक्षेच्या नावावर राजकारण करत आहेत.
मधुकर पिचड यांनीही भाजप सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, भाजपच्या जाहिरनाम्यात प्रत्येकवेळी राम मंदिराचा उल्लेख असतो. मग आजवर मंदिर का बांधले नाही. भाजप दिल्लीत ७ स्टार कार्यालय बांधते. ज्याची किंमत ४ हजार कोटी रुपये आहे. मग राम मंदिर बांधण्यासाठी यांचे हात कुणी रोखले होते.