कोल्हापूर- काल दिवसभरात 3 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीच्या बैठकीचे आयोजन करून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्याचा आढावा घेतला. गावा-गावात प्रबोधनावर भर देवून नियमावली समजावून सांगा. विनामास्क असणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करा, असे निर्देश ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. तर समूह संसर्ग थांबविण्यासाठी सर्वांनीच सतर्क राहून प्रयत्न करावेत. ट्रेसिंग झाल्यानंतर तात्काळ संबंधितावर उपचार सुरू करा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिल्या.
ग्रामविकासमंत्री मुश्रीफ म्हणाले, दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे. 15 ऑगस्टपर्यंत परिस्थिती अशीच राहील. त्यासाठी सर्वांनी खबरदारी घेवून पूर्वतयारी ठेवावी. रॅपीड अँटिजेन टेस्टला सुरुवात करावी. लक्षणे दिसल्यावर व्यक्तीला उपचारासाठी त्वरित दाखल करावे. नागरिकांनींही लक्षणे दिसल्यास स्वत:हून उपचारासाठी दाखल व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
मुश्रीफ पुढे म्हणाले, विशेषत: ग्रामीण भागात मास्क वापरण्यासाठी गावा-गावात प्रबोधन करावे. सामाजिक अंतर राखण्याबाबतही माहिती द्यावी. जे विनामास्क असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. रुग्णसंख्या वाढत असतील तर गावांनी कडक लॉकडाऊन करावे. एकही मृत्यू होणार नाही याची सर्वांनी सतर्क राहून काळजी घ्यावी.
यावेळी पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, सर्वांनीच आता सतर्क राहून खबरदारी घेण्याची गरज आहे. समूह संसर्ग थांबविण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत. लक्षणे दिसल्यावर उपचार सुरू झाला पाहिजे. त्यासाठी झालेल्या सर्वेक्षणाचा नियोजनासाठी वापर करा. सर्वेक्षण करणाऱ्या पथकांनी अधिक काळजी घ्यावी. मृत्यू रोखण्यासाठी ट्रेसिंग झाल्याबरोबर उपचार सुरू करा. व्याधीग्रस्त नागरिकांवर अधिक लक्ष केंद्रित करा, असेही सतेज पाटील यांनी म्हटले.
यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, तहसीलदार अर्चना कापसे आदी उपस्थित होते.