मुंबई - भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना दिलेली 310 कोटींची बँक हमी रद्द झाली आहे. भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी खासदार धनंजय महाडिक, जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे आणि भाजपचा दरवाजा ठोठावून आलेले काँग्रेस नेते कल्याणराव काळे यांच्या साखर कारखान्यांना फडणवीस सरकारने दिलेली हमी महाविकास आघाडीने आज एका विशेष बैठकीत रद्द केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पदभार स्वीकारताच अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. फडणवीस सरकारने गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत घेतलेल्या निर्णयांचा आढावा ठाकरे सरकार घेत आहे. त्यातच फडणवीस सरकारने या नेत्यांच्या साखर कारखान्यांना बँक हमी का दिली हे तपासले आहे. राजकीय हेतूने या कारखान्यांना बँक हमी दिल्याचे आढळल्याने बँक हमी रद्द केल्याची माहिती सहकार विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आधी बँक हमी आणि खेळत्या भांडवलापोटी या 4 नेत्यांच्या कारखान्यांना तत्कालीन सरकारने मदत दिली होती. पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, धनंजय महाडिक यांचा भीमा साखर कारखाना, विनय कोरे यांचा श्री तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखाना आणि कल्याणराव काळे यांचा सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखाना यांना ही हमी देण्यात आली होती.
कोणाला किती हमी?
- पंकजा मुंडे – वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना – 50 कोटी
- धनंजय महाडिक – भीमा साखर कारखाना – 85 कोटी
- विनय कोरे – श्री तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखाना – 100 कोटी
- कल्याणराव काळे – सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखाना – 75 कोटी
सरकारी हमीमुळे या साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास महामंडळा (एनसीडीसी) मार्फत कर्ज मिळाले असते. या कारखान्यांना कोणत्या निकषावर हमी देण्यात आली, हे ठाकरे सरकारने पडताळले आहे. त्यामुळे या चार नेत्यांना धक्का बसला आहे. आधीच पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा असताना त्यांना आणखी एक धक्का बसला आहे.