रायगड- मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात धामणदेवी येथे 200 मीटर मार्गावर दरड कोसळली असून हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. पोलादपूर पोलीस आणि एलअँडटीचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून रस्त्यावर पडलेली दरड काढण्याचे काम सुरू आहे. मात्र तोपर्यत मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे.
महामार्गावर वाहतूक सुरू होण्यास आठ ते दहा तास लागण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, जिल्ह्यात काल पासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. जिल्ह्यातील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. काल 8 जून रोजी रात्री आणि आज पहाटे 9 जून रोजी महाड विन्हेरे मार्गावर दरड कोसळल्याने हा मार्ग बंद झाला होता. दरड काढल्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू झाला होता.