'कोण होणार करोडपती' या रियालिटी शो लवकरच सोनी मराठी वर दाखल होणार आहे. याच गेम शो ची पत्रकार परिषद नुकतीच अँग्रीया क्रूझ शिपवर पार पडली. या कार्यक्रमाच सूत्रसंचालन करणाऱ्या नागराज मंजुळेने ग्रँड एन्ट्री घेत क्रूझला फ्लॅग दाखवून या शोच्या अनोख्या सफरीला सुरुवात केली.
नागराज मंजुळे हे आपल्या 'झुंड' या सिनेमाचं शुटिंग करत असतानाच सोनीच्या टीमकडून त्यांना हा शो होस्ट करण्याची ऑफर देण्यात आली. त्यावेळी अवघ्या पाचच मिनिटात विचार करून त्यांनी हा शो होस्ट करायला होकार दिला. नागराज यांच्यात सर्वसामान्य माणसातले गुण हेरून त्याला स्टारपदी नेण्याची ताकद असल्याने त्याची या शोच सूत्रसंचालन करण्यासाठी निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आलं.
दुसरीकडे या शोला होकार दिल्यानंतर नागराजला त्याच्या व्यक्तिमत्वात अनेक बदल करावे लागले. त्यासाठी उन्हात जाण्यापासून स्वतःला मज्जाव करण्यापासून ते आयुष्यात पहिल्यांदाच 'स्पा आणि सलून'ची पायरी चढून नवीन हेअरकट मेडीक्यूर, पेडीक्यूर करावं लागलं. त्यानंतर या शोसाठी अनेक दिवस खास तयारी करावी लागली. मात्र हे सगळंच पहिल्यादा करत असल्याने आपण एन्जॉय केल्याचं त्याने सागितलं. शो साठी तयार केलेलं एक खास गाणं श्रीरंग गोडबोले यांनी लिहिलं असून, ए व्ही प्रफुलचंद्र यांनी त्याला संगीत दिलंय. विशेष म्हणजे नागराजने स्वतः हे गाणं गायलंय.
बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत तो शुटिंग करत असला तरीही आपण हा शो होस्ट करत असल्याचं त्याने काहीस उशिरा सांगितलं. मात्र त्यानंतर त्यांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या आणि मग या शो मागचा त्यांचा विचार नागराजला समजावून सांगितला.
यंदा नेहमीप्रमाणेच या शो मध्ये फिफ्टी फिफ्टी, लोकांचं जनमत, आणि एक्स्पर्टची मदत आशा तीन लाईफलाइन असतील. मात्र विशेष म्हणजे साडेतीन लाख रुपये जिंकल्यानंतर ते कसे गुंतवावे याचं मार्गदर्शन करणाऱ्या वित्तिय सल्लागाराचा सल्ला चॅनल कडून स्पर्धकाला मोफत देण्यात येणार आहे. मात्र त्याच्या वापर करायचा अथवा नाही हे सर्वस्वी स्पर्धकाच्या इच्छेवर अवलंबून असेल.
याशिवाय यंदा पहिल्यादा हिंदी केबीसी प्रमाणेच मराठीतही 'कर्मवीर' आणि 'प्ले आलोंग' या दोन्ही संकल्पना राबवण्यात येतील. 'सोनी लिव्ह' एपवरुन प्रेक्षकांना खेळात सहभागी होऊन प्रश्नांची उत्तर देता येतील. त्यातही संपूर्ण राज्यातून सगळ्यात जलद उत्तर देणाऱ्या व्यक्तींना विशेष पुरस्कार देण्यात येतील. प्रसंगी डिजिटल सर्टिफिकेट देण्याची योजना चॅनलने तयार केली असून हे सर्टिफिकेट आपल्या सोशल मीडिया अकौंटवरून लोकांना शेअर ही करता येईल.
'उत्तर शोधलं की जगणं बदलतं' अशी टॅगलाईन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणारा हा शो अनेक बाबतीत नवा आहे. आता नागराज हा शो नक्की कसा होस्ट करतो ते पाहण्यासाठी मात्र 27 मे ची वाट पहावी लागेल.