मुंबई- सर्दी, ताप, खोकला, थकवा, चव न कळणे आणि वास न येणे, ही लक्षणे दिसली की कोरोनाची भीती लहानांपासून मोठ्यांपर्यंत वाढते. पण आता मात्र पालकांनो सावध व्हा!
15 वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये जर जीभ लाल होणे, शरिरावर लाल चट्टे, ताप आणि पोटात-छातीत प्रचंड वेदना असतील तर त्वरित रुग्णालय गाठा. कारण ही कोरोनाची लक्षणे आहेत. कावासाकी आजरातील ही लक्षणे कोरोनाग्रस्त लहान मुलांमध्ये दिसत असल्याने आता चिंता वाढली आहे.
लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण कमी आहे. पण गेल्या दोन आठवड्यात मात्र हा आकडा थोडाफार वाढला आहे. त्यातच पूर्व उपनगरातील एका खागसी रुग्णालयात 14 वर्षाच्या कोरोना रुग्णामध्ये कावासाकीची लक्षणे आढळली आहेत. हा कावासाकी आजारच आहे का हे अद्याप स्पष्ट नाही. पण कोरोनाची लागण झालेल्या अनेक लहान मुलांमध्ये ही लक्षणे दिसत असल्याची माहिती सायन रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. आकाश पाटील यांनी दिली आहे.
1 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना कावासाकी आजार होतो. तर हा आजार नवीन नसून 50 वर्षे जुना आजार आहे. भारतात वर्षाला या आजाराचे दोन-तीन रुग्ण आढळतात. कावासाकी विषाणू मुलांच्या थेट हृदयात प्रवेश करत स्नायूंवर हल्ला करतो. त्यामुळे मुलांची प्रकृती गंभीर होते. त्यामुळे वेळेत मुलांना उपचार मिळणे अत्यंत गरजेचे आहे. पण मुंबईत मात्र आता याच आजाराची लक्षणे कोरोनाग्रस्त मुलांमध्ये दिसू लागली आहेत. हा कावासाकी आजारच आहे असे आताच म्हणता येत नाही. पण कावासाकीसारखी लक्षणे अर्थात जीभ लाल होणे, शरिरावर लाल चट्टे, प्रचंड ताप, छातीत दुखणे अशी लक्षणे कोरोना रुग्णांमध्ये आहेत, असेही डॉ. पाटील म्हणाले.
अद्याप कावासाकी आजार दिसून आला नाही, मात्र भविष्यात सांगता येत नाही, असेही डॉ. पाटील म्हणाले. दरम्यान लहान मुलांना कोरोनापासून आणि अशा सर्वच आजरांपासून दूर ठेवण्यासाठी पालकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. तेव्हा ती त्यांनी घ्यावी, पण घाबरून जाऊ नये, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.