रायगड - सरकारला जाग येण्यासाठी आणि जनतेपर्यंत पत्रकारांच्या भावना पोचण्यासाठी कर्जत-खालापुरातील पत्रकारांनी आत्मक्लेष आंदोलन केले. पत्रकारांनी 1 मे रोजी आपल्याच घरी दिवसभर आत्मक्लेश आंदोलन केले.
कोरोनामुळे असंख्य पत्रकारांचे आतापर्यत गेले बळी -
सुमारे पाच हजार पत्रकारांना कोरोनाची लागण झाली आहे. पत्रकारांना वेळेत आणि योग्य उपचार मिळत नसल्याने पत्रकारांचे कोरोनाने मृत्यू होत आहेत. जवळचे मित्र एका पाठोपाठ सोडून जात असल्याने माध्यम जगतात मोठी काळजी व्यक्त केली जात आहे. तर सरकार मात्र बेफिकीर असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
सर्व वयोगटातील पत्रकारांना लस द्यावी, कोरोना बळी ठरलेल्या पत्रकारांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत मिळावी, पत्रकारांसाठी रूग्णालयात ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचा बेड राखीव ठेवावा आणि योग्य उपचार मिळावेत, अशा मराठी पत्रकार परिषदेने मागण्या केलेल्या आहेत. त्यासाठी आंदोलनही केले. मात्र, मागण्या पूर्ण होत तर नाहीतच पण सरकारने अगोदरची सवलत रद्द करून मुंबईत लोकलने प्रवास करण्यासही पत्रकारांना आडकाठी आणली आहे. हे सारं हेतूतः होतंय का? अशी शंका घ्यावी. एवढी उदासिनता दिसते आहे, असा आरोपही आंदोलकांनी केला.
आत्मक्लेश आंदोलनाला पत्रकारांचा उत्फुर्त प्रतिसाद -
कोरोनाने सगळ्यांना घरातच जेरबंद केल्याने रस्त्यावर येता येत नाही. यामुळे सरकारच्या पत्रकारांप्रतीच्या निष्काळजीपणाचा निषेध करण्यासाठी 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी आत्मक्लेष आंदोलन करण्याचे आवाहन जेष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख यांनी केले होते. पत्रकारांनी आपल्या घरीच बसून लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून हे आंदोलन सुरू केले. आंदोलनाचा एक भाग म्हणून दिवसभर अन्नत्याग केला. सकाळी 8 वाजता हे आंदोलन सुरू झाले ते सायंकाळी 6 पर्यत चालले. या आत्मक्लेष आंदोलनाने सरकारवर काही फरक पडेल की नाही पण पत्रकारांच्या संतप्त भावना किमान जनतेपर्यंत नक्की पोहोचतील, म्हणून हे आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले अशी भावना यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली.
1 मे रोजी सायंकाळी कर्जत नायब तहसीलदार सोपान बाचकर यांनी आत्मक्लेश आंदोलन करीत असलेल्या जेष्ठ पत्रकार विजय मांडे यांच्या निवासस्थानी येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यासाठीचे कर्जत प्रेस क्लबचे निवेदन स्वीकारले. याप्रसंगी अध्यक्ष राहुल देशमुख, विकास मिरगणे, ज्ञानेश्वर बागडे, भूषण प्रधान उपस्थित होते. तर खालापूर तहसीलदार इरेश चप्पलवार यांना खालापुर प्रेस क्लबच्या वतीने रायगड प्रेस क्लब सल्लागार भाई ओव्हाल, उपाध्यक्ष प्रशांत गोपाळे, खालापूर प्रेस क्लब खजिनदार मुकुंद बेंबडे यांनी दिले.