औरंगाबाद - जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर आवक वाढली आहे. गेल्या चोवीस तासांत जायकवाडीच्या पाण्यात तब्बल दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. याच गतीने पाणी आले तर पुढच्या दोन दिवसांत जायकवाडी निश्चितपणे 50 टक्क्यांच्या जवळपास भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाड्यातल्या काही भागांना हा दिलासाच असल्याचे म्हणावे लागेल.
नाशिक जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस रविवारी दिवसभर कोसळत होता. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्वच धरणांतून पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आणि ते पाणी जायकवाडीत यायला सुरुवात झाली. जवळपास दोन लाख क्युसेक्स वेगाने हे पाणी जायकवाडी धरणात दाखल झाले. त्यामुळे जायकवाडीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांत जायकवाडीच्या पाणी पातळीत वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसाने जायकवाडी धारण जिवंत झाले. गेल्या काही महिन्यांपासून जायकवाडीच्या मृतसाठ्यातून पाणी उपसा केला जात होता. ऐन पावसाळ्यात जायकवाडी धरणाने तळ गाठल्याने उद्योग अडचणीत येतील, अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र गेल्या चार दिवसांत नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली आणि मृतावस्थेत असलेले जायकवाडी जिवंत झाले. सोमवारी मध्यरात्री दोन ते अडीच लाख क्यूसेक्स वेगाने पाणी जायकवाडी धरणात दाखल होत होते. पावसाचा जोर कमी झाल्याने वेग थोडा मंदावला असला तरी जायकवाडी धरणात पाणी आल्याने माराठवाड्यातील लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे हे नक्की.