नॉटिंगघम - विश्वचषकाच्या तयारीसाठी इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात एकदिवसीय मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथ्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला ३ गडी राखून पाणी पाजले. पाकिस्तानने निर्धारित ५० षटकात ७ बाद ३४० धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने जेसन रॉय याचे शतक आणि बेन स्टोक्सच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर हे आव्हान ३ गडी आणि ३ चेंडू राखून पार केले.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण केले. पाकची सुरुवात निराशाजनक झाली. चौथ्याच षटकात मार्कवुडच्या चेंडूवर इमाम उल हल रिटायर्ड झाला. त्यानंतर फखर जमान ५७ आणि बाबर आजम ११५ धावांची खेळी केली. दुसऱ्या गड्यासाठी बाबर आणि हाफिज यांनी १०४ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. शोएब मलिकने ताबडतोब ४१ धावांची खेळी केली. सर्फराज अहमद २१ धावांवर नाबाद परतला. इंग्लंडकडून टॉम कुरेन सर्वात यश्वस्वी गोलंदाज ठरला. मार्क वुडने २ आणि जोफ्रा आर्चरने १ गडी बाद केला.
विजयासाठी ३४१ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतलेल्या इंग्लंडच्या सलामीच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात करुन दिली. जेम्स विंसे आणि जेसन रॉय यांनी पहिल्या गड्यासाठी ९३ धावांची सलामी दिली. विंसे ३९ चेंडूत ४३ धावा काढून क्लिन बोल्ड झाला. त्यानंतर जो रुट इमाद वसिमच्या गोलंदाजीवर ३६ धावा काढून बाद झाला. मॉर्गनच्या जागेवर संघाची धुरा सांभाळणारा जोस बटलर हा शून्यावर बाद झाला. मोईन अलीला देखील खाते उघडता आले नाही.
इंग्लंडने झटपट ३ गडी बाद केल्यानंतर बेन स्टोक्सने डाव सावरला. स्टोक्सने नाबाद ७१ धावांची खेळी केली. जेसन रॉयने ८९ चेंडूत ११४ धावांची नेत्रदीपक खेळी केली. त्यामध्ये ६ षटकार आणि ११ चौकारांचा समावेश होता. पाकिस्तानचा या मालिकेतील सलग तिसरा पराभव आहे.