तेहरान - इराकमधील बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात इराणच्या कुदस फोर्सचा म्होरक्या कासीम सुलेमानी ठार झाला. त्यानंतर इराणने अमेरिकेचे सर्व लष्कर दहशतवादी असल्याचे जाहीर केले आहे. कासीम सुलेमानीला ठार मारल्यानंतर याचा गंभीर बदला घेण्याची शपथ इराणचे अध्यक्ष अयातुल्लाह खामेनी यांनी याआधीच घेतली आहे.
सर्व अमेरिकेचे सैन्य दहशतवादी असल्याचा ठराव इराणच्या संसदेने पारित केला आहे. अमेरिकीच्या सैन्याला इराणने सुलेमानी यांच्या हत्येसाठी जबाबदार धरले आहे. इराणच्या संसदेतील सर्व सदस्यांनी उभे राहुन या ठरावास मंजुरी देत अमेरिकेविरोधी घोषणा दिल्या.
अमेरिकेचे ५ हजारांच्या आसपास लष्कर इराकमध्ये तळ मांडून आहे. इराकमधील कट्टरवादी गट इसिसशी लढण्यासाठी इराकने अमेरिकेकडून मदत घेतली आहे. हे लष्कर माघारी पाठवण्यासाठी इराकच्या संसदेने विशेष अधिवेशन बोलावले आहे. यासंबधी कार्यवाही इराकच्या संसदेत सुरू आहे. इराकमधून माघारी जाण्यासाठी अमेरिकेचे लष्कर तयारी करत आहेत. अशा बातम्याही येत आहेत. मात्र, अमेरिकेने इराकमधून सैन्य काढून घेण्याचे वृत्त फेटाळले आहे.
अमेरिकेने बगदाद विमानतळावर केलेल्या हल्ल्यात पॉप्युलर मॉबिलायझेशन फोर्सचा कमांडर अल मुबान्दीस हाही ठार झाला आहे. या उच्च राजनैकित हत्येनंतर इराणमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्याचा कठोर बदला घेतला जाईल, असे इराणने स्पष्ट केले आहे. त्यानंतर एकाच दिवसात अमेरिकेच्या लष्करावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला.
एकीकडे इराणचे अध्यक्ष अयातुल्लाह खामेनी यांनी अमेरिकेला या हल्ल्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे. इराण समर्थक बिगर लष्करी फौजांनी अमेरिकेच्या या कृत्याचा निषेध केला आहे. तसेच अमेरिकेवर हल्ला करण्यास रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. काल (शनिवारी) कासीम सुलेमानी यांच्या अंत्यविधीसाठी इराकमध्ये जनसागर लोटला होता. 'रिव्हेंज ईज कमिंग' अशा घोषणा देत हजारो इराण समर्थक बगदाद शहरात रस्त्यावर उतरले होते.