नवी दिल्ली - जागतिक स्तरावर वाघांचे संवर्धन करण्यासाठी भारत नेतृत्त्व करण्यास तयार आहे. व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापनासाठी भारत इतर देशांशी मिऴून काम करण्यासही तयार असल्याचे वक्तव्य पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केले. जगभरात 29 जुलै हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो. जमीन आणि पावसाची कमतरता असतानाही देशात 8 टक्के जैवविविधता वाढली. या कामगिरीचा भारताला अभिमान असल्याचे जावडेकर म्हणाले.
1973 साली भारतात फक्त 9 व्याघ्र प्रकल्प होते. आता त्यांची संख्या 50 झाली आहे. यातील एकही प्रकल्प सर्वसाधारण दर्जाचा नसून सर्व प्रकल्प उच्च किंवा चांगल्या दर्जाचे आहेत. एकूण जागतिक जमीनीपैकी भारताची जमीन अडीच टक्के आहे. तर पाऊस 4 टक्के पडतो, आणि लोकसंख्या 16 टक्के आहे. तरही भारतात जगाच्या आठ टक्के जैवविविधता आहे. त्यात 70 टक्के वाघांची संख्या आहे, असे जावडेकर म्हणाले.
जगभरात तेरा देशांमध्ये वाघ आढळतात. भारत, बांगलादेश, भुतान, कंबोडिया, चीन, इंडोनेशिया, लाओ पिडीआर, मलेशिया, म्यानमार, नेपाळ, रशिया, थाडलँड आणि व्हिएतनाम. यातील इतर 12 देशांबरोबर व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापन, संवर्धन, प्रशिक्षण आणि सुविधा वाढविण्यासाठी भारत या देशांचे नेतृत्व करण्यास तयार आहे, असे जावडेकर म्हणाले. यावेळी जावडेकर यांनी 50 भारतीय व्य़ाघ्र प्रकल्पांचा अहवालही प्रदर्शित केला. देशात मध्यप्रदेशात सर्वात जास्त वाघ असून त्याखालोखाल कर्नाटक राज्यात आढळतात.