लातूर - माझा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. निवडणुकीच्या काळात सगळ्याच पक्षांचे लोक आशिर्वाद घेण्यासाठी येत असतात. पण, मतदान कुणाला करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. असे स्पष्टीकरण अहमदपूरच्या डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी दिले आहे. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा न दिल्यास भाजपला मतदान करू नका, अशा आशयाची त्यांची क्लिप सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औसा येथे सभा झाली होती. या सभेत तुळजाभवानी आणि सोलापूरच्या सिद्धेश्वर महाराजांसह अहमदपूरच्या डॉ. शिवलिंग शिवाचार्यांचे नाव घेतले होते. याला प्रतिवाद करण्यासाठी विरोधकांकडून शिवलिंग यांची एक जुनी ऑडियो क्लीप सोशल मीडियावर फिरवली जात आहे. ज्यात शिवलिंग शिवाचार्य लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याची मागणी करत आहेत.
स्वतंत्र धर्माचा दर्जा न दिल्यास भाजपला मतदान करु नका, असे आवाहन ते या क्लिपमध्ये करताना दिसत आहेत. त्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले आहेत. या क्लिपचा कोणी गैरफायदा घेऊ नये यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली आहे. तसेच, आपल्या जुन्या क्लिपबाबत स्पष्टीकरण दिले आहे. मी हिंदुत्ववादी असलो तरी कोणत्याही पक्षाशी बांधील नाही अशी पुस्ती त्यांनी जोडली.