मुंबई - कोरोनाचे मृत्यू लपवत असल्याचा आरोप झाल्यावर मुंबई महापालिकेला 862 मृत्यूंची नोंद करावी लागली होती. त्यानंतर पालिका आयुक्तांनी 48 तासात मृत्यूंची नोंद करावी असे आदेश दिले आहेत. त्यानंतरही 19 ते 27 जून या 9 दिवसात 48 तासांपूर्वीच्या 490 मृत्यूंचीच नोंद करण्यात आली आहे. यामुळे पालिका आयुक्तांच्या आदेशाला रुग्णालयांकडून केराची टोपली टाकल्याचे निदर्शनास येत आहे.
मुंबई महापालिका कोरोना विषाणूमुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा लपवत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या आरोपानंतर राज्य सरकारच्या आदेशाने महापालिकेने 862 मृत्यूंची नोंद केली होती. मृत्यूंची नोंद रुग्णालयांकडून केली जात नसल्याने मृत्यूंची माहिती मुंबई महापालिकेकडे 48 तासांच्या आत कळविणे बंधनकारक असल्याचे आदेश पालिका आयुक्तांनी रुग्णालयांना दिले आहेत. पालिका आयुक्तांच्या आदेशानंतरही रुग्णालयांनी गेल्या 9 दिवसात 48 तासात मृत्यूंची नोंद केली नसल्याचे उघड झाले आहे.
मुंबई महापालिकेकडून कोरोनाबाबत रोज प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या अहवालानुसार 19 जून ते 27 जून दरम्यान 48 तासात 414 मृत्यू झाले आहेत. याच कालावधीत 48 तासांपूर्वी झालेल्या 490 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. वास्तविक पाहता या कालावधीत 48 तासात झालेले 414 व 48 तासांपूर्वीच्या 490 अशा एकूण 904 मृतांची नोंद झाली आहे. मात्र पालिकेच्या अहवालात 48 तासांमध्ये होणाऱ्या मृत्यूंची नोंद लक्ष केंद्रित होईल, अशी केली जात आहे तर 48 तासांपूर्वीच्या मृत्यूंची आकडेवारी लक्ष जाणार नाही अशा प्रकारे आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध केली जात आहे. यावरून पालिका आयुक्तांनी आदेश देऊनही गेल्या 9 दिवसात रुग्णालयांनी 48 तासात मृत्यू नोंद करण्याकडे दुर्लक्ष केल्याने पालिका आयुक्तांच्या आदेशाला केराच्या टोपलीत टाकल्याचे समोर आले आहे.
रुग्णालयांवर कठोर कारवाई -
कोविड 19 या संसर्गजन्य आजाराने बाधित रुग्णांच्या मृत्यूची 48 तासांच्या मुदतीत महापालिकेकडे माहिती देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतरही रुग्णालये मुदतीत मृत्यूंची नोंद करत नसल्याने त्यांना 29 जून पर्यंत मृत्यूंची नोंद करण्याची अंतिम संधी देण्यात आली आहे. वारंवार संधी देऊनही मृत्यूची माहिती न कळवणाऱ्या रुग्णालयांवर यापुढे 'साथरोग नियंत्रण कायदा 1897' अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे.
19 ते 27 जून दरम्यानच्या मृत्यूंची नोंद
दिनांक - 48 तासातील - 48 तासांपूर्वीचे
19 जून - 55 - 59
20 जून - 75 - 61
21 जून - 41 - 00
22 जून - 20 - 46
23 जून - 42 - 65
24 जून - 38 - 82
25 जून - 58 - 40
26 जून - 44 - 73
27 जून - 41 - 64
एकूण - 414 - 490