रायगड- जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाने सुरुवात केली असून अधूनमधून मुसळधार पाऊस झाला आहे. तसेच, हवामान विभागाने जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दिवसभर पडत असलेल्या पावसामुळे रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीने धोक्याची पातळी गाठली असल्याने नदिकाठावरील सर्व गावांना प्रशासनातर्फे सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून जिल्ह्यात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली असून सखल भागात पाणी साचले आहे. जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहे. मात्र, कुंडलिका नदी सोडून इतर नद्यांनी धोक्याची पातळी गाठलेली नाही, हे दिलासादायक आहे. कुंडलिका नदीची धोका पातळी 23.95 असून आतापर्यत 23 मीटर इशारा पातळीपर्यत पाणी पोहोचले आहे. त्यामुळे रोहा तालुक्यातील नदिकाठच्या गावांमधील नागरिकांना आणि प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने दिल्या आहेत. दरम्यान, सतत पडणाऱ्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 81.36 मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. दि. 1 जूनपासून आज अखेर एकूण सरासरी 1 हजार 275.56 मि. मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात अलिबाग 45.00 मि. मी., पेण - 80.00 मि. मी., मुरुड-154.00 मि. मी., पनवेल-92.00 मि.मी, उरण-155.00 मि.मी, कर्जत-47.40 मि.मी, खालापूर-65.00 मि.मी, माणगाव-82.00 मि.मी, रोहा-107.40 मि.मी, सुधागड-50.00 मि.मी, तळा-141.00 मि.मी, महाड-42.00 मि.मी, पोलादपूर-58.00 मि.मी, म्हसळा-48.00 मि.मी, श्रीवर्धन-87.00 मि.मी, माथेरान-48.00 मि.मी, असे आजचे एकूण पर्जन्यमान 1301.80 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 81.36 मि.मी इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 39.66 टक्के इतकी आहे.