मुंबई - मुंबईत काल पासून सुरू झालेल्या पावसाने आज पहाटे पासून पुन्हा हजेरी लावत मुंबईला झोडपून काढले. यामुळे सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला. पावसामुळे ग्रँटरोड येथील एडनवाला या इमारतीचा काही भाग कोसळला. त्यात दोन जण जखमी झाल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मुंबईतील कुलाबा येथे काल सकाळी 8 वाजल्यापासून ते आज सकाळी 8 वाजेपर्यंत 121.6, तर सांताक्रूझ येथे 96.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर आज सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत कुलाबा येथे 39 तर सांताक्रूझ येथे 80.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सायंकाळी 6 वाजेपर्यंत शहर विभागात 59.93, पूर्व उपनगरात 36.96, तर पश्चिम उपनगरात 57.3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
दोन जण जखमी
मुंबईत चार ठिकाणी घर आणि भिंत कोसळण्याच्या तक्रारींची नोंद झाली आहे. दुपारी सव्वा एकच्या सुमारास ग्रँटरोड पाववाला लेन येथील एडनवाला या म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतीचा काही भाग कोसळला. त्यामधील 20 कुटुंबियांना मागाठाणे व गोराई येथील ट्रान्झिट कॅम्पमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. या घटनेत जखमी झालेल्या सकिना एडनवाला (वय 75), मुर्तुझा एडनवाला (वय 49) या दोघांना जवळच्या एच.एन रिलायंस रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर इमारतीत अडकलेल्या 5 जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले आहे.
या ठिकाणी पाणी साचले -
हिंदमाता, दादर टीटी, किंग सर्कल माटुंगा, सायन रोड नंबर 24, रुईया कॉलेज माटुंगा, शेख मिस्त्री दर्गा वडाळा, बीपीटी कॉलनी, टिळक ब्रिज दादर, अंधेरी सबवे या ठिकाणी पाणी साचले होते.
झाडे पडली, शॉर्टसर्किट -
मुंबईत एकूण 24 ठिकाणी झाडे आणि फांद्या पडण्याच्या, तसेच 6 ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटनांची नोंद झाली आहे. या दुर्घटनांमध्ये कोणीही जखमी झालेले नाही.
पावसाचा इशारा -
कुलाबा वेधशाळेने पुढील 24 तासांसाठी वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर व उपनगरात आकाश ढगाळ राहून जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिजोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.