नाशिक - शहरामध्ये आज(शनिवार) सायंकाळी दोन तासांपेक्षा जास्त वेळ जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहराच्या अनेक सखल भागात पाणी साचले आहे. शहरातील नाशिक रोड, पंचवटी, सिडको, जुने नाशिक, गंगापूर रोड आदी ठिकाच्या सखल भागात मोठ्या प्रमाणत पाणी साचल्याने वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली. नाशिक रोड पोलीस ठाण्यातील डीबी रूममध्ये पाणी साचल्याने पोलीस कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. पोलिसांनी स्वतः गुडघ्याभर पाण्यात उतरून डीबी रूममधील महत्वाचे दस्तऐवज बाहेर काढले.
पावसाचे पाणी गाड्यांमध्ये शिरल्याने अनेक वाहने नादुरुस्त झाली. जोराचा पाऊस झाल्याने गोदावरी नदीच्या पाण्याची पातळीही वाढली. नदीला अनेक लहान मोठे नाले येऊन मिळत असल्याने पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
गोदावरी नदीच्या गंगापूर धरणातून कुठलाही विसर्ग करण्यात आला नसला तरी पावसाचे पाणी नदीत मिसळत असल्याने होळकर पुलाखालून 600 क्यूसेस पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत केला जात आहे. पुढील दोन दिवस नाशिक जिल्ह्यातील जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.