कोल्हापूर - गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा आज (सोमवारी) सर्वोच्च न्यायालयात फैसला होणार आहे. सत्तारूढ गटाच्या याचिकेवर गेल्या आठवड्यात न्यायालयाने निवडणुकीबाबत म्हणणे सादर करण्याचा आदेश दिला होता. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग, त्यात दोन ठरावधारकांचा कोरोना संसर्गाने झालेला मृत्यू, या सर्व घडामोडींवर न्यायालय काय आदेश देते, याकडे संपूर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, 2 मे रोजी मतदान असल्याने प्रचार यंत्रणा देखील गतिमान झाली आहे. गोकुळच्या निवडणुकी संदर्भात राज्य सरकारने २६ एप्रिलपूर्वी आपले म्हणणे सादर करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला गेल्या आठवड्यात दिले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोकुळ दूध संघाची निवडणूक स्थगित करावी, अशी याचिका जिल्ह्यातील एका दूध संस्थेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. पुढील सुनावणी आज (दि.२६ एप्रिल) रोजी होणार आहे.
राज्यात कारोना महामारीचे संकट आणखी वाढू लागले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या रुपाने संपुर्ण राज्यात कोरोना रुग्णांचे संकट गंभीर झाले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका ३१ ऑगस्ट पर्यंत लांबणीवर टाकल्या आहेत. मात्र, गोकुळसह राज्यातील १६ संस्थांना वगळून हा आदेश काढला आहे. एकीकडे राज्य शासनाने कोरोना रोखण्यासाठी निवडणुकांना स्थगिती देतानाच दुसरीकडे गोकुळ व इतर १५ संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम चालूच ठेवण्यात आला आहे. याच्या विरोधात गोकुळ दूध संघाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका फेटाळण्यात आली.
कोरोनाचे संकट वाढतच चालल्याने गोकुळ दूध संघ व्यवस्थापनाने कोरोना संकटाचा धोका गोकुळ निवडणुकीतही होवू शकतो. इतर संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या असताना गोकुळचीच निवडणुकीसाठी एवढा अट्टाहस कशासाठी? निवडणूकीत प्रचार करताना व मतदारांपर्यंत पोहचताना दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांना धोकादायक आहे. तरी इतर संस्थांप्रमाणे गोकुळची निवडणूकही स्थगित करावी, अशी याचिका दाखल केली होती. मात्र, एक महिन्यापुर्वी दाखल केलेल्या या याचिकेवर अद्याप सुनावणी झाली नव्हती. आज दुपारनंतर (दि. २६ एप्रिल ) यावरती सुनावणी होवून निवडणूकीचे भवितव्य ठरणार आहे.