मुंबई- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या उन्हाळी सत्रातील अंतीम वर्ष अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा 16 जुलैपासूनच घेतल्या जाणार आहेत. यासाठीचे वेळापत्रक आज विद्यापीठाने जाहीर केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी सुरू करावी, अशा सूचना विद्यापीठाकडून देण्यात आल्या आहेत.
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षाही रद्द केल्या जाव्यात यासाठी मागील काही दिवसात विविध विद्यार्थी संघटणांनी मागणी केली होती. त्या मागणीला धुडकावून आज विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. तुर्तास हे वेळापत्रक तात्पुरते असल्याचेही विद्यापीठाकडून सांगण्यात आले असले तरी या परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाने ठाम भूमिका घेतली असल्याने त्यात आता बदल केला जाणार असल्याचेही सांगण्यात येते.
विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी कोविड-19 आजाराचा प्रादुर्भाव व टाळेबंदीच्या सध्याच्या परिस्थितीच्या अनुषंगाने परीक्षार्थींनी सध्याचे वास्तव्याचे ठिकाण सोडू नये, तसेच अनावश्यक प्रवास टाळावा अशा सूचना केल्या आहेत. तसेच सध्याच्या सोयीच्या वास्तव्याच्या ठिकाणीच शांतपणे परीक्षेची तयारी करावी. परीक्षा संदर्भात आवश्यक सूचना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील असेही म्हटले आहे. राज्यात सोशल माध्यमांवर परीक्षेच्या संदर्भात येणाऱ्या कोणत्याही बातम्या आणि मेसेजेस्वर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये. विद्यापीठ परीक्षा संबंधी अधिक माहिती शिक्षक, विद्यार्थी, पालक व अभ्यांगत यांनी विद्यापीठाचे संकेतस्थळ www.muhs.ac.in वरील माहिती अधिकृत समजण्यात यावी, असेही डॉ. पाठक यांनी म्हटले आहे.
राज्यात कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता त्या-त्या परिस्थितीनुसार व शासनाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार अंतिम निश्चित वेळापत्रक हे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे आज विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.