नाशिक - देशभरात आज हनुमान जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. नाशिकच्या अंजनेरी मंदिरात आज पहाटे हनुमानाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
हनुमान जयंतीनिमित्त अंजनेरी येथील हनुमानाच्या मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली होती. यावेळी हनुमानाच्या मूर्तीला महावस्त्र परिधान करण्यात आले होते. त्र्यंबकेश्वरजवळील अंजनेरी किल्ला हनुमानाचे जन्मस्थान म्हणून संपूर्ण भारतात परिचित आहे. अंजनी पुत्राचा अर्थात हनुमानाचा जन्म याच किल्ल्यावर झाल्याने किल्ल्याला अंजनेरी नाव दिल्याची आख्यायिका आहे.
गेल्या दोन दिवसांपासून अंजनेरी गडावर मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली असून यावर्षी हनुमान जन्मोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या १ लाखांपर्यंत पोहचू शकते असा अदाज मदिर समितीने वर्तवला आहे.
आज पहाटेच्या सुमारास अंजनेरी पर्वतावर जाण्यासाठी भाविकांची रीघ लागलेली होती. अंजनेरी येथे नाशिक- त्र्यंबक रस्त्यावर हनुमानाची भव्य मूर्ती आहे तिथे देखील जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.