सांगली - जत तालुक्यातील शासकीय धान्य गोदामात चोरी झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे.चोरट्यांनी डल्ला मारत 1850 रुपये किमतीचे धान्य लंपास केले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी की,जत तालुक्यातील स्वस्थ धान्य दुकानासाठी पुरवठा करणारे धान्य शासकीय गोदामात ठेवले जाते व त्या ठिकाणाहून तालुक्यात धान्याचा पुरवठा केला जातो. जत शहरापासून दोन किलोमीटरच्या अंतरावर हे गोदाम आहे. एरव्ही या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात असतात. मात्र आता त्या ठिकाणी असणारे सुरक्षा रक्षक हे काही महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाल्याने त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाची जागा रिक्त आहे. रविवारी सायंकाळी नेहमी प्रमाणे येथील कर्मचारी इस्माईल शेख गोदाम बंद करून गेले.
मात्र, या ठिकाणी रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक नसल्याने चोरट्यांनी फायदा घेत गोदामाच्या पाठीमागील बाजूचे शेटर उचलून गोदामामध्ये प्रवेश केला. 50 किलो वजनांची तांदळाची 9 पोती 1350 रुपये किमतीची व 50 किलो वजनांची 5 मक्याची पोती 500 रुपये किमतीची असा 1850 रुपयाचा मुद्देमाल त्यांनी लंपास केला.या घटनेची माहिती मिळताच जतचे तहसीलदार सचिन पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. या प्रकरणी संशयित आरोपींवर 380 प्रमाणे जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास सुरू आहे.