वर्धा - अनेकदा अपघात झाला की जखमींना रुग्णालयात नेण्यापेक्षा चित्रीकरण करण्याला काहीजण महत्व देतात. इथे मात्र चक्क आमदार अपघातग्रस्तांच्या मदतीला धावल्याने इतराना धडा मिळाला आहे. पलटी खाललेल्या कारमधील चौघांना स्वतःच्या वाहनात नेत आमदार गिरीश व्यास त्यांच्यासाठी देवदूतच ठरले.
वर्धा नागपूर मार्गावर पवनार जवळ नागपूरकडून येताना कारवरचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. कारमधील चार प्रवासी जखमी झाले. दरम्यान रस्त्याने जाताना नागपूर येथील भाजपा आमदार गिरीश व्यास यांना हा अपघात दिसला. आमदार व्यास यांनी लागलीच वाहन थांबवले. जखमींना गाडी बाहेर काढत विचारपूस केली. तसेच जखमीना आपल्या वाहनात नेऊन स्वतः रुग्णालयात दाखल करत माणुसकीचा परिचय दिला.
या कारमध्ये नागपूरच्या मानेवाडा परिसरातील रहवासी हरीश पाटेकर, पत्नी कविता, रत्ना जांभळे आणि अरुण जांभळे हे वर्ध्यातील पुलंगाव येथे एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी जात होते. मात्र अचानक त्यांचे कार अनियंत्रित होत रस्त्याच्या खाली उतरली. यात कार पलट्या खात रस्त्याच्या खालच्या बाजूला उतरली. यात चौघेही प्रवासी जखमी झाले.
आमदार गिरीश व्यास यांनी जखमी स्वतःचा वाहनाने वर्धा येथील गांधी यांच्या रुग्णालयात दाखल केले. तसेच या अपघाताची माहिती आमदारांनी रुग्णाच्या नातेवाईकांना दिली. गांधी यांच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करत रुग्णांना नागपूर येथे हलविण्यात आले.
रस्त्यावर होणाऱ्या अपघात नंतर अनेक नागरिक जखमींना मदत करण्याऐवजी मदतीची याचना करत तिथेच मरणासन्न अवस्थेत सोडून देतात. मात्र आमदार असले तरी व्यस्त कार्यक्रमात जखमींना उपचार देऊन मदतीला जात अनेकांना संदेश दिला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.