मुंबई - जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होणे अधिक सुलभ व्हावे, यादृष्टीने मतदानाच्या दिवशी म्हणजेच २९ एप्रिल रोजी दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत वाहन सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - २०१९ बाबत उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार मतदार संघ, मतदान केंद्र व मतदार संख्या यांचा विचार करता मुंबई उपनगर जिल्हा हा संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. त्यामुळेच दिव्यांग व्यक्तींना वाहन सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
दिव्यांग व्यक्तींची नाव नोंदणी यापूर्वीच सुरू करण्यात आली असून, मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदारसंघांच्या कार्यक्षेत्रातून आजपर्यंत १८६ दिव्यांग मतदारांनी या सुविधेसाठी नाव नोंदणी केली आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे १०३ दिव्यांग मतदारांची नोंदणी ही मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात झाली आहे. आतापर्यंत ३४४ वाहनांचे नियोजन करण्यात आले असून आवश्यकतेनुसार वाहनांची संख्या वाढवण्यात येणार आहे. तरी मुंबई उपनगर जिल्ह्यातील अधिकाधिक दिव्यांग मतदारांनी या सुविधेसाठी नाव नोंदणी करावी व या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे करण्यात आले आहे. दिव्यांग मतदार देखील या मदत केंद्रांशी ०२२-२६५१-००२० या क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदणी करत आहेत.
आतापर्यंत १८३ मतदारांनी या सुविधेसाठी नाव नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या दिव्यांग मतदारांना मतदानाच्या दिवशी त्यांना घेण्यासाठी येणाऱ्या वाहनाचा क्रमांक व वेळ ही दिव्यांग मतदाराच्या फोनवर मेसेजद्वारे कळविण्यात येणार आहे. मोफत वाहन सुविधेच्या नोंदणीसाठी दिव्यांग मतदारांनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी दिव्यांग मतदाराचे नाव, त्यांचा मतदार क्रमांक व लोकसभा मतदारसंघ क्रमांक आदी तपशील मेसेजद्वारे किंवा व्हॉट्सअॅपद्वारे ९८६९-५१५-९५२ किंवा ८६५५-२३५-७१४ या क्रमांकावर पाठवल्यास वाहन नोंदणी करण्यात येईल.
याचबरोबर मतदान केंद्रांवर दिव्यांगांना रांगेशिवाय प्रवेश, संख्या अधिक असल्यास दिव्यांगांसाठी स्वतंत्र रांग, रॅम्प सुविधा, अधिक प्रकाश व्यवस्था, व्हील चेअर जाऊ शकेल असा मोठा दरवाजा, दिव्यांगांसाठी स्वतंत्र पार्किंग तसेच डोली आदी सुविधा देखील असणार आहेत. मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी दिव्यांग मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून एकही दिव्यांग मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी जागृती मोहीमही राबवली जात आहे.
वरील माहितीनुसार, मुंबई उपनगर जिल्ह्यातून १८६ दिव्यांग मतदारांनी मोफत वाहन सुविधेसाठी आतापर्यंत नोंदणी केली आहे. यामध्ये मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून १७, मुंबई उत्तर पश्चिम (वायव्य) लोकसभा मतदार संघातून ३८, मुंबई उत्तर पूर्व (ईशान्य) लोकसभा मतदारसंघातून २४, तर उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून १०३ दिव्यांग मतदारांनी नोंदणी केली आहे. त्याचबरोबर दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश हा मुंबई उपनगर जिल्ह्यात असून सदर दोन विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातून ४ दिव्यांग मतदारांनी मोफत वाहन सुविधेसाठी नोंदणी केली आहे.