सोलापूर- रेशनकार्ड नसणाऱ्या सांगोला तालुक्यातील 1 हजार 584 कुटुंबातील 5 हजार 975 नागरिकांना मोफत धान्य वाटप योजनेची सुरुवात सांगोल्याचे तहसीलदार योगेश खरमाटे यांच्या हस्ते करण्यात आली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आले. मात्र त्यामुळे निर्माण झालेल्या स्थितीवर मात करण्यासाठी केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय पॅकेज अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना जाहीर केली आहे. तसेच कोणत्याही राज्य शासनाच्या योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या, शिधापत्रिका नसलेल्या नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे. त्यानुसार सांगोला तालुक्यातील 103 गावांमध्ये व सांगोला शहरामध्ये तलाठी व शहारामध्ये नगरपरिषद सांगोला यांच्या मार्फत सर्व्हे करण्यात आला. त्यात तालुक्यातील 1 हजार 584 कुटुंबातील 5 हजार 975 नागरिकांजवळ शिधापत्रिका नसल्याचे समजले.
सदर कुटुंबांना मे व जून महिन्याकरिता प्रतिमाहिना 5 किलो या प्रमाणे प्रत्येक व्यक्तीस 10 किलो याप्रमाणे वाटप करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी सोलापूर यांच्याकडून तांदूळ व हरभरा शासकीय धान्य गोदाम येथे प्राप्त झालेले आहे.
धान्याचे वाटप करण्यासाठी सांगोला तालुक्यात जवळपासच्या गावातील कुटुंबांच्या घरांनुसार एकूण 25 वाटप केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. उदनवाडी, जुजारपूर, बुरंगेवाडी, पारे, बुद्दैहाळ, कोळा, तिप्पेहाळळी, कटफळ चिकमहूद, महूद बुद्रुक, नवी लोटेवाडी, य. मंगेवाडी, अजनाळे, नाझरे, मांजरी, बामणी, वाढेगाव, सांगोला शहर, बागलवाडी, खिलारीवाडी, शिवणे, सोनंद, निजामपूर ईत्यादी गावात केंद्र तयार करण्यात आलेली आहेत. लाभार्थींना तांदुळ व हरभरा डाळीचे मोफत वाटप करण्यात येत आहे.