जळगाव - शहरातून दुचाकी, चारचाकी चोरीचे सत्र थांबताना दिसत नाही आहे. शहरात एक दोन दिवसाआड वाहन चोरीच्या घटना घडतच आहेत. आता मायदेवीनगरातून एका घराबाहेर उभी केलेली चारचाकी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे.
मायदेवीनगर येथील रहिवासी रवींद्र हरी पाटील यांनी यांची चारचाकी (एमएच १९ सीएफ २१०९) सोमवारी रात्री ९.३० वाजता लॉक करुन घराबाहेर उभी केली होती. यांनतर मंगळवारी सकाळी सहा वाजता ते घराबाहेर आले असता त्यांना चारचाकी दिसली नाही. या प्रकरणी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार प्रवीण जगदाळे तपास करीत आहेत.
तसेच दुसऱ्या एका घटनेत शहरातील मू.जे. महाविद्यालय परिसरातील निरंजन अपार्टमेंट येथील पार्कींगमधून मनोजकुमार तोमर यांची दुचाकी (एमएच १९ बीएच ३२६०) चोरट्यांनी लांबवली. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. या प्रकरणी तोमर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार विश्वनाथ गायकवाड तपास करीत आहेत.
शहरात वारंवार होत असलेल्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे लवकरात लवकर या वाहन चोरांवर कारवाई करावी अशी मागणी नागरीक करत आहेत.