बीड- जिल्हा आरोग्य विभागाने बुधवारी 57 स्वॅब कोरोना चाचणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले होते. त्यातील 5 जण कोरणा पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. या 5 पैकी 1 जण बीड शहरातील हिनानगर भागातील रहिवासी आहे. इतर चार जण बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील रहिवासी आहेत.
केज तालुक्यातील माळेगाव येथील एक महिला औरंगाबादला गेल्यावर 15 जून रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. दोन दिवसांपूर्वी तिचा औरंगाबाद येथे मृत्यू झाला होता. मात्र, ती केज येथील हॉस्पिटलमध्ये आणि तिच्या मूळ गावी माळेगाव येथे थांबली होती. तिच्या कुटुंबातील लोकांचा मंगळवारी स्वँब घेतला होता. बुधवारी त्या एकाच कुटुंबातील चौघांचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला.
तर बीड शहरातील हिनानगर येथील एक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. बुधवारी आढळून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 52 वर्षीय पुरुष हिनानगर, बीड, 38 वर्षीय पुरूष, माळेगाव ( ता.केज), 36 वर्षीय महिला माळेगाव (ता.केज), 62 वर्षीय पुरुष माळेगाव (ता.केज) तर 13 वर्षीय बालक, माळेगाव ( ता. केज) असा समावेश आहे.
आज घडीला 28 जणांवर जिल्ह्यात उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत 65 जण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तर उद्या गुरुवारी आणखी 4 व्यक्ती कोरोनामुक्त होवून घरी परततील अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली.