वर्धा - जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या आष्टी तालुक्यातील साहूर या गावातील शेतकऱ्यांचे महिन्याभरापासून पीक कर्ज मंजूर झाले नव्हते. त्यामुळे गावातील एक शेतकरी बँकेत जाब विचारण्यासाठी गेला. यात बँक कर्मचाऱ्यांशी वादावादी होऊन शेतकऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे. आज प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विकास दांडगे यांनी जाब विचारण्यासाठी गेले असता पुन्हा बँकेत वाद झाला आहे.
साहूरच्या बँक ऑफ इंडिया शाखेतील कर्मचारी पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. हरीश भूंभर, हा युवा शेतकरी मागील महिन्याभरापासून सात ते आठ वेळा बँकेत चकरा मारून थकला, मात्र काही झाले नाही. अखेर 30 जूनला संतप्त होत त्याने बँक मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांना जाब विचारला. यावेळी बँकेतील काही कर्मचाऱ्यांनी त्याला शिवीगाळ केली. यासह कर्जाची केस करत नाही, जे होते ते करून घे, अशा शब्दात बोलत असल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे.
याबाबत माहिती मिळताच प्रहारचे जिल्हाध्यक्ष विकास दांडगे यांनी बँकेत जाऊन जाब विचारला. यावेळी बँकेतर्फे उडवा उडवीचे उत्तर मिळत असल्याने पुन्हा वाद झाला. काही वेळासाठी वातावरण चांगलेच तापले. चर्चा करत शेतकऱ्याला कर्ज उपलब्ध करून देण्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी बँकेचे शाखा व्यवस्थापक अजिंक्य तिनखेडे यांनी, आम्ही मागील दोन महिन्यात 500 शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून दिले आहे. यात या शेतकऱ्याच्या कागदपत्रांवर असलेल्या सह्या चुकल्या असल्याने त्याला बोलवले होते. यावेळी त्याचे कर्ज मंजूर होऊन त्याला पीककर्ज सुद्धा मिळणार असल्याचे बँक व्यवस्थापक यांच्याकडून सांगण्यात आले.
प्रहरच्या वतीने कडक भूमिका घेण्यात आली
शेतकऱ्यांना कर्ज देण्यास त्रास किंवा टाळाटाळ होत असल्यास कडक भूमिका घेतली जाईल, असा इशारा प्रहरच्यावतीने देण्यात आला आहे. बँकेत चर्चा करताना बँक कर्मचाऱ्याकडून उर्मट शब्द वापरल्याने प्रहार आणि बँक कर्मचाऱ्यामध्ये वाद झाल्याचे समजले आहे. यात बँकेच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे तक्रार करणार असल्याची चर्चा आहे. जर असे होत असेल तर बँक कर्मचाऱ्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. यात बँका टाळाटाळ करत असल्यास गुन्हा दाखल करावा, असे जिल्हाधिकाऱ्यांची सूचना आहे. यात बँक अधिकारी, कर्मचारी यांनी कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याने गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रहारकडून करण्यात आली आहे.