राहाता : 'कोरोना प्रादुर्भावामुळे वाढणारी रुग्णसंख्या ही अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रणासाठी शासनाने लागू केलेल्या नियमांचे सर्वांनी कडक पालन करावे', असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. अहमदनगरच्या राहाता तालुक्यातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
नागरिकांनी सहकार्य करावे
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राहाता तालुक्यातील प्रशासकीय व आरोग्य अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, लसीकरण व विविध उपाययोजनांचा आढावा बैठकीत घेतला. प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे कडक पालन करून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. उपलब्ध बेड संख्या, अत्यावश्यक व्हेंटिलेटरची गरज, लसीकरणाची व्यवस्था कोविड केअर सेंटरबाबत करावयाच्या उपाययोजना आदींचा आढावा यावेळी त्यांनी घेतला. साई संस्थानने पुढाकार घेऊन कोविड केअर सेंटर येथे जास्तीत जास्त कोरोना बाधितांना वैद्यकीय सेवा पुरवावी अशी सूचना त्यांनी केली. आवश्यकतेनुसार आजूबाजूच्या तालुक्यातील रुग्णांवर शिर्डी येथे उपचार करता येईल अशी व्यवस्था साईबाबा संस्थानने करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिले असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांत आढावा बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती दिली. उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
खासदार सदाशिव लोखंडे, आमदार डॉ.सुधीर तांबे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रमोद म्हस्के, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, शिर्डी न.पं. चे मुख्य अधिकारी काकासाहेब डोईफोडे, राहाता ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.गोकुळ घोगरे, साईबाबा हॉस्पिटल चे डॉ. प्रीतम वडगावे, डॉ. मैथिली पितांबरे, नगर पंचायतीचे मुख्य लिपिक देसले, डॉ.एकनाथ गोंदकर, यावेळी उपस्थित होते.