हिंगोली - राज्यात मान्सूनचे जोरदार आगमन झाले आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील विविध भागात नुकत्यात सुरू झालेल्या खरिपाच्या पेरण्या या पावसाने खोळंबल्या आहेत. सलग सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील विविध भागातील शेत शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे शेताला तळ्याचे रूप आल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे बाजार पेठेत देखील खते, बी - बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसत आहे. मात्र, जोरदार बरसणाऱ्या पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली आहे.
हिंगोली जिल्ह्यात सलग चार ते पाच दिवसांपासून पाऊसने हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातला शेतकरी समाधानी आहे. जिल्ह्यातील बऱ्याच भागात खरिपाच्या पेरणीला सुरुवात झालेली आहे. वेळेत पेरणी व्हावी, यासाठी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरचा आधार घेतला आहे. जिल्ह्यातील बऱ्याच भागातील पावसामुळे शिवारांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी करताना चांगलीच अडचण येत आहे. शेतात वाफसा होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे पुन्हा एकदा पेरण्या लांबणीवर पडण्याची भीती आहे. परंतू यावर्षी मृग नक्षत्रामध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदात भर पडली आहे.
सोमवारी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची पेरणीची कामे अर्धवट राहिलेली आहेत. तर काही शेतामध्ये पाणी साचल्याने बियाणे देखील वाहून गेले असून दुबार पेरण्या करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येण्याची शक्यता आहे. या पावसामुळे शेतात गुडघाभर पाऊस साचल्याने, शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. वास्तविक पाहता सेनगाव तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे. त्यात पुन्हा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.