रायगड - निसर्ग चक्रीवादळाने नागरिकांच्या घरांच्या छतावरील पत्रे उडून गेले आहेत. वादळामुळे मोठ्या प्रमाणात झाडे पडली आहेत. घरावरील पत्रे उडून गेल्यामुळे पत्रे बसविणे गरजेचे असल्याने सध्या वाढत्या मागणीमुळे दुकानात पत्रे मिळत नसून काही दुकानदारांनी पत्र्यांचे दरही वाढवले आहेत. त्यामुळे नागरिकांची आर्थिक कोंडी होत आहे. बाजारात पत्र्याची आवक वाढविली जाणार असून त्याचे दर स्थिर ठेवण्यात येणार आहेत. चढ्या दराने कोणी पत्रे देत असतील तर त्यावर प्रशासनाचे लक्ष असून आम्ही दुकानात जाऊन याबाबत खात्री करीत असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी भरत शितोळे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यातील लाखो नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. घर, इमारती, हॉटेल यांच्या छतावर लावलेले पत्रे हे वादळी वाऱ्याने उडून नेले. तर झाडे पडून पत्रे तुटून गेले आहेत. वादळ शांत झाले असले तरी आता सुरू झालेल्या पावसापासून वाचण्यासाठी तुटलेले, उडालेले पत्रे लावणे गरजेचे आहे. मात्र, बाजारात अचानक वाढलेल्या सिमेंट, प्लास्टिक पत्र्याच्या मागणीने पत्रे मिळणे कठीण झाले आहे. दुकानात असलेला माल हा संपला आहे. तसेच पत्र्याचे दर ही काही ठिकाणी वाढविले गेल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहे. तसेच पत्र्याची आवक वाढविणेही गरजेचे आहे.
याबाबत अप्पर जिल्हाधिकारी भरत शितोळे यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही पत्र्याची आवक वाढविण्यासाठी प्रयत्नशील असून नागरिकांना पत्रे मिळतील. तसेच दुकानदारांनी पत्र्याचे दर वाढऊ नये. याकडेही जिल्हा पुरवठा अधिकारी लक्ष देत आहेत. पत्रे व्यापारी यांच्याकडे जाऊन सत्य परिस्थितीची पाहणी करून काही अडचण असल्यास ती सोडविण्यात येणार असल्याचे संगितले. मात्र, दुकानदारांनी पत्र्याचे दर वाढू नये, असे आवाहनही शितोळे यांनी केले आहे.
पत्र्यांचे दर वाढले नसून आहेत तेच आहेत. मात्र, अचानक पत्र्याची मागणी वाढली असून माल कमी असल्याने अडचणी येत आहेत. कंपनीकडे पत्र्याची मागणी केली असून मुरुड तालुक्यात साधारण 250 टन पत्र्याची गरज आहे. त्यामुळे या संकटसमयी आम्ही ग्राहकांना माल लवकरात लवकर पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत, अशी माहिती नांदगाव येथील पूजा सेल्सचे मालक नंदकुमार सोनी यांनी दिली.