मुंबई - इंग्लंडमध्ये ३० मे पासून विश्वचषकाला सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघात निवडण्यात आलेला दिनेश कार्तिक हा सर्वात सीनियर खेळाडू आहे. दिनेश कार्तिकने २००४ साली सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली पहिला सामना खेळला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत तो एकूण ७ कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळला आहे.
दिनेश कार्तिक विराटच्या नेतृत्वाखाली विश्वचषकाच्या संघात खेळणार आहे. दिनेश २००४ साली एकच सामना खेळला होता. त्यानंतर २००६ साली त्याला पुन्हा संघात घेण्यात आले. त्याने राहुल द्रविडच्या नेतृत्वावाखाली २१ सामने खेळले. या २१ सामन्यात त्याने ३०१ धावा केल्या होत्या. यात ६३ ही त्याची सर्वेश्रेष्ठ धावसंख्या होती.
दिनेश कार्तिकने २००६ ते ०९ या कालावधीत वीरेंद्र सेहवाग आणि सुरैश रैना यांच्या नेतृत्वात प्रत्येकी ४ सामने खेळले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्याला ९ सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती.
दिनेश कार्तिक सर्वाधिक सामने महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळला आहे. विशेष म्हणजे दिनेशची बॅट विराटच्या नेतृत्वाखाली झालेल्या सामन्यात तळपली. धोनीच्या नेतृत्वाखाली त्याने १९ सामन्यात ६९९ धावा केल्या. तर कोहलीच्या नेतृत्वाखाली २२ सामन्यात त्याने ४३० धावा केल्या आहेत.