कोचीन (केरळ) - प्रेयसीच्या भावाने तलवारीने केलेल्या हल्ल्यात एक 20 वर्षीय दलित तरूण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. रविवारी संध्याकाळच्या सुमारास मुवतूपुझा येथे ही घटना घडली. हल्लेखोराचा या तरूणाचे आपल्या बहिणीशी असलेल्या प्रेमसंबंधाला विरोध असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या हल्ल्यात तरूणाच्या हातावर, मानेवर आणि चेहऱ्यावर गंभीर वार झाल्याने गंभीर जखमी झाला असून त्याला कोट्टायम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात हा तरूण गंभीर जखमी झाला असून त्याला सोडविण्यासाठी आलेला त्याचा मित्रही या हल्ल्यात किरकोळ जखमी झाला आहे.
दरम्यान, पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला असून हल्ल्यात मदत करणार्या 17 वर्षीय मुलाला ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी भादंवि कलम 307 अन्वये खुनाचा प्रयत्न करणे आणि अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी सायंकाळी एका दुकानासमोर पीडित दलित तरूण मास्क घेण्यासाठी आला असता ही घटना घडली. तेथे दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याला दुकानातून बाहेर येण्यास सांगितले आणि तो बाहेर आल्यानंतर त्याच्यावर तलवारीने हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली.