सोलापूर - मागील अडीच महिन्यांपासून विडी कामगार महिलांच्या हाताला काम नाही. हाताला काम नसल्यामुळे विडी कामगार महिलांचे खूप हाल होत आहेत. त्यामुळे येत्या 8 जूनपासून विडी कारखाने सुरू झाले नाही, तर 10 जूनला महापालिकेला घेराव घालण्याचा इशारा माकपाचे नेते माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी दिला आहे. शुक्रवारी (5 जून) यासंदर्भात माकपच्या दत्त नगर येथील कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विडी कामगार यूनियनचे महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. 8 जून पर्यंत विडी कारखाने सुरू झाले नाही तर 10 जून रोजी महापालिकेला घेराव घालण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.
ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या अध्यक्षतेखाली सिटूचे राज्य महासचिव अॅड. एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली लाल बावटा विडी कामगार युनियनची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत लढाऊ विडी कामगार महिला आणि युनियनचे पदाधिकारी यांनी पुढील आंदोलनाची दिशा व कार्यक्रम निश्चित केला. यावेळी बैठकीत मार्गदर्शन करताना कॉ. नरसय्या आडम मास्तर म्हणाले की, तब्बल 3 महिन्यांच्या टाळेबंदीच्या कालावधीनंतर सुद्धा विडी कारखाने चालू करण्यासंदर्भात संभ्रम निर्माण झालेला आहे. या पार्श्वभूमीवर कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घेण्यात येणाऱ्या सर्व शासन आणि प्रशासनाच्या सूचनांसह कारखाने सुरु करावे, अशी आग्रही मागणी पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनापुढे मांडून सुद्धा कारखाने सुरु करण्यात आले नसल्यामुळे सर्व लढाऊ विडी कामगार यांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे 8 जूनपर्यंत विडी कारखाने सुरु न केल्यास बुधवार 10 जूनला “चलो इंद्रभवन” चा नारा देत सोलापूर महानगरपालिकेला घेराव घालण्यात येणार आहे.
सिटूचे राज्य महासचिव अॅड. एम. एच. शेख यांनी आंदोलनाची पार्श्वभूमी व कार्यक्रम जाहीर करताना पुढील माहिती दिली. सोलापूर शहरात मोठ्या संख्येने विडी कामगार असून त्यांच्या कुटुबियांचा उदरनिर्वाह मुख्यतः याच उद्योगावर अवलंबून आहे. देशात आणि राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे विडी कारखाने बंद आहेत. केंद्राने आणि राज्य सरकारने आश्वासित केल्याप्रमाणे 29 मार्चच्या अध्यादेशाप्रमाणे त्यांना या काळातील मजुरी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतू केंद्रीय गृहमंत्रालयाने 17 मे च्या अध्यादेशाने वेतन अदा करण्याच्या अध्यादेशाला स्थगिती दिली आहे. या एकूण काळात या विडी कामगारांना कांही प्रमाणात कारखानदारांनी दोन हजार रूपये त्यांच्या खात्यात जमा केले आहेत. प्रत्यक्षात ती लॉकडाऊन कालावधीची मजुरी आहे कि अनामत रक्कम आहे हेही माहित नाही. परंतू काही कामगारांना यापैकी काहीच मिळाले नसल्याची वस्तुस्थिती आहे. असे असले तरी या कामगारांना बंद काळातील मजुरी मिळेल या आशेने त्यांचे शेजारी, नातेवाईक, किराणा दुकानदार, किरकोळ विक्रेते यांना उसनवारीवर मदत केली. परंतू 17 मे च्या अध्यादेशानंतर त्यांनीही आपला हात काढून घेतला असून उधारीसाठी तगादा लावायला सुरुवात केली आहे. यामुळे या कामगारांचे जगणे दुरापास्त झाले आहे. विडी कामगार महिलांच्या खात्यावर प्रत्येक महिन्याला 10 हजार रूपये या प्रमाणे लॉकडाऊन मधील तीन महिन्याचे पैसै जमा करावेत, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे.