जळगाव - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे जळगावसह जिल्हावासियांच्या चिंतेत भर पडत आहे. सोमवारी (15 जून) जिल्ह्यात कोरोनाचे ७६ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या आता १ हजार ८०४ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, जळगाव शहरात कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक होत आहे. सद्यस्थितीत एकट्या जळगाव शहरात एकूण ३२२ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यामुळे जळगाव शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
जळगाव जिल्ह्यात सोमवारी ७६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधिक २३ रुग्ण चोपडा तालुक्यातील तर त्या खालोखाल १४ रुग्ण जळगाव शहरातील आहेत. भुसावळ, रावेर आणि पारोळा येथेही प्रत्येकी ७, जळगाव ग्रामीण १, अमळनेर १, धरणगाव ३, यावल ४, एरंडोल ५, जामनेर १ तर मुक्ताईनगरात ३ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हा प्रशासनाला सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये जिल्ह्यातील चोपडा तालुका आणि जळगाव शहरात कोरोनाबाधितांची मोठी संख्या आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग थांबत नसल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढतच चालला आहे. अशा परिस्थितीत सक्षम उपाययोजना करण्याची गरज आहे, असा मतप्रवाह पुढे येत आहे. सध्या लॉकडाऊनमध्येही काही प्रमाणात शिथिलता देण्यात आल्याने संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे.
जळगाव जिल्ह्यातील तालुका निहाय कोरोना अपडेट -
जळगाव शहर- ३२२
भुसावळ-३१७
अमळनेर- २२९
चोपडा- १४१
पाचोरा-४३
भडगाव- ९३
धरणगाव- ८८
यावल- ९६
एरंडोल- ५६
जामनेर- ८४
जळगाव ग्रामीण- ५६
रावेर- १३३
पारोळा-९३
चाळीसगाव-१८
मुक्ताईनगर- १५
बोदवड-१४
इतर जिल्ह्यातील-६
एकूण- १८०४