नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये किती दहशतवादी ठार झाले? या प्रश्नाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अगदी जवळचे सॅम पित्रोदा यांनी हा प्रश्न उपस्थित केला. यापूर्वीही समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांनीही भाजप सरकारवर पुलवामा हल्ल्यावरून आरोप केले होते. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर या प्रकारचे प्रश्न भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकतात, असे म्हटले जात आहे.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी भारताने केलेल्या एअर स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केले आहेत. भारतीय वायु सेनेने हवाई हल्ल्यामध्ये ३०० दहशतवाद्यांना मारले हे अत्यंत स्तुत्य आहे. मात्र, आकड्यांवर आपल्याकडे काही पुरावे आहेत का? भारतीय सेनेने पाकिस्तानला किती प्रमाणात नेस्तनाभूत केले याची माहिती घेण्याचा नागरिकांना अधिकार आहे, असे थेट प्रश्न पित्रोदा यांनी केला आहे.
आपण न्यूयॉर्क टाईम्स सारख्या जगभरातील मोठ्या वृत्तपत्रांमध्ये वाचले. त्यानंतर माझी या हवाई हल्लाबद्दल जाणून घेण्याची इच्छा वाढली, असे स्पष्टीकरण पित्रोदा यांनी दिले. आपण खरच हवाई हल्ला चढवला का? या हल्ल्यात आपण ३०० दहशतवादी मारले का?असे संशयात्मक प्रश्न त्यांनी उचलले आहेत. देशाचा नागरिक असल्यामुळे मला हे माहिती करण्याचा पूर्ण अधिकार आहे. अशा प्रकारचे प्रश्न करणे हा माझा अधिकार असल्याचेही पित्रोदा यांनी ठणकावून सांगितले आहे.
आपण म्हणता की ३०० दहशतवादी ठार झाले. मग जगातील एकही प्रसार माध्यम याबद्दल पुष्टी का देत नाही? देशाचा एक नागरिक म्हणून मला पडलेल्या या प्रश्नाचे वाईट वाटते, असे मतही पित्रोदा यांनी व्यक्त केले आहे.
पित्रोदा आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसच्या घोषणापत्र समितीचे सदस्य आहेत. त्यावरून ते काँग्रेसच्या किती जवळचे आहेत याचा अंदाज येतो. ते समोर म्हणतात की, मी गांधीवादी आहे. मी कोणत्याही गोष्टीच्या निवारणासाठी चर्चा करण्यावर विश्वास ठेवतो. माझे मत आहे की सर्वांनीच चर्चेचा मार्ग अवलंबला पाहिजे. केवळ पाकिस्तानच नाही तर संपूर्ण जगासोबत बोलले पाहिजे.
मुंबई येथे दहशतवादी हल्ला झाला तर आपणही प्रत्युत्तर देऊ शकत होतो. मात्र, जगाला तोंड देण्याचा हा योग्य पर्याय नाही. जर काही देशातील ८ लोक येऊन हल्ला करतात तर त्यासाठी संपूर्ण देशाला दोष देणे चांगले नाही, असेही पित्रोदा यांनी स्पष्ट केले. कोणत्याही घटनेची माहिती ही निष्पक्ष असते. यासाठी आपण भावूक होऊन चालणार नाही. यासाठी कोणीही येऊन म्हणेल की आम्ही ३०० लोक मारले तर आम्ही त्यावर विश्वास का ठेवावे? असा उलट प्रश्न पित्रोदा यांनी केला आहे. त्यांच्या विचारांशी काँग्रेसचा संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मी तर्कपूर्ण बोलतो आणि त्यावरच विश्वास ठेवतो, असेही त्यांनी म्हटले आहे.