सोलापूर- महिला वकील अॅड. स्मिता धनंजय पवार आत्महत्या प्रकरणी मृत महिला वकिलाची आई सितादेवी विठ्ठल गोवे (वय 50 रा, मंगळवेढा) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात हुंडाबळीबाबत तक्रार दाखल केली आहे. यामध्ये पती, सासू, ननद यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
धनंजय शिवाजी पवार (पती), शैलजा शिवाजी पवार (सासू), सविता शिवाजी पवार (ननद), दीपाली शिवाजी पवार (ननद) सर्व रा. जुनी पोलीस लाईन मुरारजी पेठ सोलापूर, अशी संशयित आरोपींची नावे आहेत. बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास जुनी पोलीस लाईन येथील राहत्या घरी अॅड. स्मिता पवार यांनी पंख्याला साडीच्या सहायाने गळफास घेत आत्महत्या केली होती. याबद्दल सितादेवी गोवे यांनी काल रात्री पावणे अकराच्या सुमारास फौजदार चावडी पोलीस ठाण्यात येऊन पवार कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली.
पवार कुटुंबामधील पती, सासू व दोन्ही ननदांनी आपल्या मुलीस शारीरिक व मानसिक त्रास देत तिचा छळ केला आहे. या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्येसारखे पाऊल उचलले. आपल्या मुलीच्या मृत्यूस पवार कुटुंबीय कारणीभूत आहे, अशी तक्रार सितादेवी गोवे यांनी दाखल केली. याबाबत पोलिसांनी संशयित आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाबळे करत आहेत.