सांगली - इस्लामपूर शहरातील डॉ. सचिन सांगरुळकर यांच्या लक्ष्मी-नारायण हॉस्पिटलमधील कोविड सेंटरमध्ये रुग्णांना चांगली सेवा दिली जात नाही. २ मे रोजी दुपारी ऑक्सिजन अभावी ६ रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला. डॉ. सांगरूळकर व त्यांची पत्नी नैनीशा यांच्या अविवेक वागण्यामुळे वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासला आहे. यामुळे हे कोविड सेंटर तत्काळ बंद करावे, अन्यथा सेंटरच्या बाहेर आंदोलन करावे लागेल, असा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी दिला. यासाठी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांना निवेदनही सादर केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून हे हॉस्पिटल व कोविड सेंटर चर्चेत आले आहे. त्यातच ६ जणांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू ही बाब धक्कादायक असून डॉ. सांगरूळकर पती-पत्नीसह येथील स्टाफ ही अविवेकी वागत आहे. रुग्णाला दाखल करून घेताना अनामत रक्कमेची मागणी करणे, डिस्चार्ज रुग्णांचे बील तीन ते चार लाख रुपये इतके भरमसाट करणे, दाखल रुग्ण व मृत्यू झालेल्या रुग्णांची शासनाला चुकीची माहिती पुरवणे, यासारख्या गंभीर चुका डॉक्टरांकडून होत आहेत. हे कोविड सेंटर माणसांना जगवण्यासाठी आहे की, मारण्यासाठी असा प्रश्न लोकांना पडला आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय दबावास न जुमानता लोक हितासाठी हे कोविड सेंटर बंद करावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.
या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे शाकीर तांबोळी, मनसेचे शहराध्यक्ष सनी खराडे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष मकरंद करळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राम कचरे, युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस विजय पवार यांच्या सह्या आहेत. या पदाधिकाऱ्यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांची भेट घेऊन या घटनेची माहिती दिली.